पुणे जिल्ह्यात देशी दारूच्या विक्रीत घट; विदेशीची विक्री वाढली
गेल्या काही वर्षांत विदेशी (फॉरेन लिकर), बिअर आणि वाईन या मद्यप्रकारांक डे मद्यशौकिनांचा ओढा वाढत असल्याचे महसूल खात्याला मिळालेल्या उत्पन्नातून स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्हा आणि शहर परिसरात देशी दारुच्या विक्रीत घट होत असून विदेशी दारुच्या विक्रीत चांगलीच वाढ झाली आहे.
सरत्या आर्थिक वर्षांत (एप्रिल २०१५ ते मार्च २०१६) मद्यविक्रीतून १,५६४ कोटी १५ लाख रुपयांचा महसूल पुणे विभागाला मिळाला. या वर्षांत विदेशी मद्यविक्रीत ११.६४ टक्के वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. बिअर आणि वाईन या मद्यप्रकारांच्या विक्रीत अनुक्रमे १०.१६ टक्के आणि १३.८९ टक्के वाढ झाली आहे. त्या तुलनेत देशी दारुच्या विक्रीत झालेली वाढ फक्त १.७८ टक्के आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षांतील देशी दारुच्या विक्रीतून मिळालेला महसूल अन्य मद्यप्रकारांच्या तुलनेत नगण्य म्हणावा लागेल, अशी परिस्थिती आहे. सन २०१४-२०१५ या आर्थिक वर्षांत मद्यविक्रीतून पुणे महसूल विभागाला १,४२० कोटी ९२ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता.
देशी दारु पिणारा वर्ग हा प्रामुख्याने कष्टकरी वर्ग असतो. गावठी दारु प्यायल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे सरकारने उसाच्या मळीपासून मद्यार्क तयार करुन देशी दारुच्या निर्मितीला सन १९७३ मध्ये चालना दिली. पुणे शहरात गेल्या दोन वर्षांत देशी दारुच्या विक्रीत घट होत चालली आहे. त्या तुलनेत विदेशी मद्य, बिअर आणि वाईन या मद्य प्रकारांच्या विक्रीत वाढ झाली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे जिल्हा अधीक्षक मोहन वर्दे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
गेल्या आर्थिक वर्षांत राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पुणे विभागाला विदेशी मद्याच्या विक्रीतून मिळालेल्या महसुलात भरीव वाढ झाली असली तरी श्रमजीवींनी देशी दारुकडे मात्र पाठ फिरवली आहे. विदेशी मद्य, बिअर आणि वाईन पिण्याक डे मद्य शौकिनांचा ओढा वाढत असल्याचेही निरीक्षण आहे.
तरुण वर्गाकडून बिअरला मोठी मागणी असते. आरोग्यासाठी वाईन पिणे हितकारक असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे वाईन पिण्यास पसंती देणारा एक वर्ग आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत देशी दारुच्या विक्रीत घट झाली आहे, असे निरीक्षण राज्य उत्पादन खात्याने नोंदविले आहे. साधारणपणे ४०-४५ वर्षांपूर्वी गावोगावी गावठी दारु तयार करण्याचा अवैध व्यवसाय जोरात होता. गावठी दारु (हातभट्टी) तयार करणारे छुप्या पद्धतीने गावाबाहेर गावठी दारु तयार करतात. गेल्या वर्षी मुंबईतील मालवणी परिसरात गावठी दारुने अनेकांचे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्य सरकारने छुप्या पद्धतीने गावठी दारु तयार करणाऱ्यांचे धंदे उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले होते.
पुणे जिल्ह्य़ातील औद्योगिक वसाहतीत रोजगाराच्या आशेने मोठय़ा संख्येने परप्रांतीय मजूर आणि राज्यातूनही मजूर येतात. गेल्या दोन वर्षांपासून औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक मजूर मूळ गावी परत गेले आहेत. श्रमजींवीकडून देशी दारुला मोठी मागणी असते. मात्र, देशी दारु पिणारा मजूर त्यांच्या मूळ गावी परतल्याने देशी दारुच्या विक्रीत घट झाली, असेही निरीक्षण मोहन वर्दे यांनी नोंदविले.