महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या फेर परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आज दुपारी एक वाजल्यापासून हा निकाल उपलब्ध झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एकूण नऊ विभागांमध्ये ६ ते २९ जूलै या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत एकूण २७.०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यभरातून १, २१, ७९९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ३२, ९२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना आपली गुणपडताळणी करायची आहे अशा विद्यार्थ्यांना २५ ऑगस्ट ते ३ सप्टेबर या कालावधीत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल. ही गुणपडताळणी सशुल्क असणार आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची प्रत हवी आहे, त्यांना निकालानंतर मंडळाकडे असलेल्या विहित नमुन्यात २५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येईल.

बारावीच्या मुख्य परीक्षेचा निकाल २५ मे रोजी जाहीर झाला होता. त्या वेळी १३,१९,७५४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ११,४१,८८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर, १,७६,८७२ विद्यार्थी अनूत्तीर्ण झाले होते. बारावी बोर्ड परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची संधी पुन्हा एकदा मिळायला हवी, असे मत त्या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर अनूत्तीर्ण विद्यर्थ्यांना संधी मिळावी यासाठी ही परीक्षा घेण्यात आली. याच परीक्षेचा आज निकाल लागला.