महिलांनी पोहायला जाणे या कल्पनेनेही गहजब व्हावा, अशा काळात पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळ या संस्थेत पोहणे शिकणाऱ्या मुलींनी नदीच्या पाण्यात लीलया उडय़ा टाकून पोहून दाखवले. मुलींना पोहणे शिकवण्यात पुढाकार घेणारी ही पहिली संस्था ठरली. पण महाराष्ट्रीय मंडळाचे महत्त्व एवढय़ावर थांबत नाही. मैदानी खेळांचे प्रशिक्षण आणि शारीरिक शिक्षणाच्या विषयातील प्रशिक्षक तयार करण्याच्या कामी या संस्थेचे योगदान उल्लेखनीय आहे.

महाराष्ट्रीय मंडळ या संस्थेच्या स्थापनेवेळी मैदानी खेळांचे प्रशिक्षण हा तिचा प्रमुख उद्देश होता. परंतु शारीरिक शिक्षण हा विषय शिकवणारे चांगले शिक्षक तयार करण्याच्या क्षेत्रातही या संस्थेने आपली खास ओळख तयार केली. आज पुण्यात कानाकोपऱ्यात राहणारे विद्यार्थी या संस्थेत आपले मैदानी खेळांमधील स्वप्न पूर्ण करू पाहत आहेत. शारीरिक शिक्षणात शिक्षक आणि प्रशिक्षक म्हणून काम करू इच्छिणारी मंडळी तर इतर राज्यांमधूनही शिकण्यासाठी पुण्यात येत आहेत.

idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर
Office of ED and National Investigation Agency in BKC mumbai
ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे बीकेसीत कार्यालय; बीकेसीतील २००० चौ. मी. चा भूखंड ईडीला

महाराष्ट्रीय मंडळ ही संस्था १९२४ मध्ये स्थापन झाली. शिवरामपंत दामले हे त्याचे प्रमुख संस्थापक. ते व त्यांची मित्रमंडळी सन्मित्र संघात जात असत. त्याच वेळी आपणही आपली एखादी संस्था उभारावी, असा विचार त्यांच्या मनात आला. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्रीय मंडळाच्या जागेत त्या वेळी लाल मातीचा आखाडा आणि विहीर एवढेच होते. त्यामुळे कुस्तीचे प्रशिक्षण या ठिकाणी प्रथम सुरू झाले. लाठी-काठी, लेझीम अशा खेळांचे प्रशिक्षणही सुरू झाले. तो काळ पारतंत्र्याचा असल्यामुळे सरकारकडून या मंडळाकडे संशयाने पाहिलेजाई. याच काळात दामले यांना पोलिसात भरती होण्याचेही आमंत्रण मिळाले. परंतु त्यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. कालांतराने संस्थेच्या विहिरीत पोहण्याचे वर्ग सुरू झाले. मैदानी खेळांचे प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून लौकिक होत गेला, तसा सरकारचा संशयही दूर झाला.

आता मुली आणि महिलांनी पोहणे शिकणे नवीन राहिलेले नाही. पण त्या काळी – म्हणजे १९३८-४०च्या सुमारास ती खूप मोठी गोष्ट होती. तेव्हा मुलींना पोहणे शिकवणारी राज्यातील पहिली संस्था म्हणजे महाराष्ट्रीय मंडळ. प्रथम त्यावर समाजातून टीकाही झाली. नदीला पावसाळ्यात पूर आल्यावर लकडी पुलावरून पाण्यात उडय़ा टाकून पोहत ओंकारेश्वरापाशी बाहेर निघणे हा उत्साही जलतरणपटूंचा दर वर्षीचा कार्यक्रमच असे. त्यांच्याबरोबर दोन मुलींनाही दामले यांनी पाण्यात उडी मारायला लावली आणि त्या यशस्वीपणे पोहल्या. तेव्हा मात्र आख्ख्या पुण्यात मंडळाचे नाव झाले, असे संस्थेचे सचिव धनंजय दामले सांगतात.

मराठी मुलांनी लष्करात जावे यासाठी संस्थेने सैनिकीकरण मंडळ सुरू केले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत जाण्यासाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रमही संस्था घेत होती. मराठी मुले इंग्लिशमध्ये थोडी कमी पडतात, हे पाहून टिळक रस्त्यावर इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली. तत्कालीन सरकारने संस्थेस मुकुंदनगर येथे ३२ एकर जागा देऊ केली. तिथे दामले यांनी शारीरिक शिक्षण महाविद्यालय सुरू करण्याचे ठरवले. हे महाविद्यालय १९७७ मध्ये सुरू झाले. दरम्यानच्या काळात चार शाळा, शारीरिक शिक्षणातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आले होते. व्यायामशाळा, मुष्टियुद्ध व योगासनांचे प्रशिक्षण, प्रथमोपचारांचे वर्ग या गोष्टीही सुरू झाल्या होत्या. मुकुंदनगरला संस्थेचा रायफल क्लब देखील सुरू झाला होता, मात्र नंतर त्या ठिकाणची वस्ती वाढल्यामुळे तो बंद करावा लागला.

शिवरामपंत दामले यांच्यानंतर रमेश दामले यांनी मुकुंदनगर येथील संस्थेचे कार्यक्रम पुढे नेले आणि त्यांच्यानंतर धनंजय दामले संस्थेचे सचिव म्हणून काम पाहतात. बास्केट बॉलचे आधुनिक मैदान, क्रिकेट अकॅडमी, स्केटिंग रिंग, मिनी फुटबॉल (फुटसॉल) या खेळांच्या सुविधाही सुरू झाल्या. तसेच गेल्या तीन वर्षांपासून संस्थेचे वाणिज्य महाविद्यालय सुरू झाले आहे. मॅटवरील व मातीवरील कुस्ती, बास्केट बॉल, बॅडमिंटन, जिमनॅस्टिक्स, मलखांब, अ‍ॅथलेटिक्स, स्केटिंग, आणि टेनिस अशा नऊ अ‍ॅकॅडमी संस्थेतर्फे चालवल्या जातात.

मैदानी खेळांचे प्रशिक्षण देणाऱ्या सुरुवातीच्या केंद्रांपैकी एक म्हणून महाराष्ट्रीय मंडळ ओळखले जाते. आता जिम आणि खेळांच्या प्रशिक्षणात अनेक संस्था आल्या असल्या, तरी अल्प दरात प्रशिक्षण देणारे केंद्र म्हणून संस्था नावाजली जाते. मुकुंदनगरचे ‘ऱ्हिदमिक जिमनॅस्टिक्स’चे केंद्र आधुनिक असून राष्ट्रीय चमूत खेळणाऱ्या आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवणाऱ्या पाच मुली इथे शिकल्या, असे धनंजय दामले सांगतात. आता संस्थेला फिजिओथेरपी केंद्र सुरू करायचे आहे.

शारीरिक शिक्षणासाठीच्या महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तर पदवी, एम.फिल. आणि पीएच.डी पर्यंत  शिकण्यासाठी महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांसह इतर राज्यांमधूनही मुले येतात. गोवा, मध्य प्रदेश, मिझोराम आणि अगदी भूतानमधूनही विद्यार्थी शिकण्यासाठी येतात, असे दामले यांनी सांगितले.

sampada.sovani@expressindia.com