महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशनतर्फे धर्म, समाजकारण, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, संस्कृत अशा विविध विषयांवरील दुर्मीळ पुस्तकांसह पाच हजार ग्रंथांचा ठेवा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे भांडारकर संस्थेच्या ग्रंथालयातील ग्रंथांची संख्या १ लाख ३५ हजार झाली आहे.
महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. संप्रसाद विनोद यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांच्याकडे हा ग्रंथठेवा रविवारी सुपूर्द केला. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, प्रा. सुधीर वैशंपायन, श्रीनंद बापट, नियामक मंडळ सदस्य शिल्पा सुमंत, श्याम सातपुते आणि प्रभारी ग्रंथपाल मेघना देशपांडे या वेळी उपस्थित होते.
महर्षी न्यायरत्न धुंडीराजशास्त्री विनोद आणि त्यांच्या पत्नी विदुषी मैत्रेयी विनोद यांनी जीवनभर ज्ञानसाधना केली. त्यासाठी आवश्यक असणारी ग्रंथसंपदा त्यांनी जोपासली. त्यांच्या पश्चात चिरंजीव डॉ. संप्रसाद विनोद आणि स्नुषा डॉ. ऋजुता विनोद यांनी हा ग्रंथठेवा योग्य पद्धतीने जतन केला. या पाच हजार ग्रंथांमध्ये दुर्मीळ आणि मौलिक माहिती देणाऱ्या ग्रंथांचा समावेश असल्याने त्यांचा उपयोग अभ्यासक आणि संशोधकांना व्हावा या उद्देशातून डॉ. विनोद यांनी हा ग्रंथसंग्रह भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला देण्याचे ठरविले.
डॉ. विनोद म्हणाले, माझे आई-वडील ज्ञानोपासक होते. त्यांच्या अभ्यासाचा ठेवा ज्ञानोपासनेचे काम करणाऱ्या संस्थेकडे सुपूर्द करावा अशी इच्छा होती. भांडारकर संस्थेतील वातावरण हे त्यासाठी पूरक असल्याने या संस्थेत अमूल्य ठेवा सुपूर्द करणे हा आमच्यासाठी आनंददायी आणि ऐतिहासिक ठरावा असा क्षण आहे.
डॉ. बहुलकर म्हणाले, महर्षी विनोद यांचा ठेवा संस्थेला मिळणे ही संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या संग्रहामुळे अभ्यासक आणि संशोधकांना निश्चितच फायदा होणार आहे. दोन खोल्यांमध्ये हा ग्रंथठेवा जतन करण्यात येणार असून त्याला महर्षी न्यायरत्न विनोद आणि मैत्रेयी विनोद ग्रंथदालन असे नाव देण्यात आले आहे. फाउंडेशनमधील अभ्यासकांना या पुस्तकांचा लाभ घेता यावा यासाठी काही विशेष सुविधा देण्यात येणार आहेत.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Gokhale Institute Pune
मतदार जागृतीच्या फलकावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; पुण्यातील गोखले संस्थेतील घटना
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन