मेळघाटातील कोरकू आदिवासींच्या आरोग्य समस्यांसंबंधी ‘मैत्री’ या संस्थेने आखलेल्या मोहिमेत सहभागी होण्याची संधी इच्छुक स्वयंसेवकांना मिळणार आहे. पुरेशा आहाराअभावी झालेले कुपोषण आणि पावसाळ्यात पसरणारी रोगराई यामुळे होणाऱ्या कुपोषणासाठी ही मोहीम काम करणार आहे.
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मेळघाटातील ११ अतिदुर्गम गावांमध्ये १५ जुलै ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वयंसेवकांचे काम चालणार आहे. यात २२० स्वयंसेवक ११ गटांमध्ये वेगवेगळ्या तारखांना मेळघाटात जातील.
१८ वर्षांवरील कोणीही व्यक्ती यात सहभागी होऊ शकणार आहे. गरोदर स्त्रियांना दररोज भेटून त्यांना आरोग्याविषयी माहिती देणे, एक वर्षांच्या आतल्या सर्व मुलांना रोज भेट देणे, सहा वर्षांवरील मुलांच्या आजारपणाकडे लक्ष ठेवणे, कुपोषित मुलांच्या घरी भेट देऊन त्यांच्या पालकांना आहाराविषयी मार्गदर्शन करणे अशा प्रकारच्या उपक्रमांचा या मोहिमेत समावेश आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला १५०० रुपये खर्च येणार असून तो स्वयंसेवकांनी स्वत:च करणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९९७०५४७०१६, ७०६६१३६६२४ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.