मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे (निवृत्त लष्करी अधिकारी) 

दहशतवाद, घुसखोरी आणि पाकिस्तानी सन्याच्या विरोधात पेटून उठलेल्या भारतीय लष्कराने कारगिल युद्धात विजय मिळविला. त्याचे स्मरण आपल्याला राहावे, याकरिता ‘कारगिल विजय दिवस’ मोठया उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक लष्करी अधिकारी आणि सनिकाच्या आयुष्यात युद्धभूमीवरील लढाईप्रमाणे विचारांची लढाई जिंकण्याकरिता पुस्तकांचा आधार घेतला जातो. माझ्याही लष्करी आयुष्यात युद्धनीती, डावपेच, शस्त्रास्त्र आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयी वाचन झाले. भारताशेजारी असलेल्या पाकिस्तान, श्रीलंकेसह लष्करी विषयांवर लेखन करण्याचाही मी प्रयत्न केला. त्यामुळे कारगिल विजय दिनाच्या पाश्र्वभूमीवर माझ्या वाचन व लेखनप्रवासाविषयी थोडेसे..

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

कोल्हापूरमधील एका छोटय़ाशा गल्लीमध्ये आमचे घर होते. वि. स. खांडेकर, ना. सी. फडके असे साहित्य क्षेत्रातील दिग्गज आमच्या इथे राहात होते. त्यामुळे आम्हा भावंडांमध्ये साहित्य वाचनाविषयी कमालीची उत्सुकता असायची. लहानपणी मी कधीही पुस्तके खरेदी करुन वाचली नाहीत; तर वाचनालयातील पुस्तके घरी आणून त्यांचे वाचन करण्याची स्पर्धा आम्हा भावंडांमध्ये लागत असे. माझे मराठी चांगले असल्याने शाळेमध्ये निबंध स्पध्रेत मी सातत्याने सहभागी होत असे. त्या वेळी एका स्पध्रेत बक्षीस म्हणून मला ना. सी. फडके यांचे ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ हे पुस्तक मिळाले होते. त्याकाळात साने गुरुजी, चिं. वि. जोशी यांच्यासह विविध लेखकांच्या साहित्याचे वाचन आम्ही करीत असू. वाचनालयाची संस्कृती उत्तम होती. त्यामुळे अवघ्या एक ते दीड रुपयाच्या वर्गणीमध्ये आम्ही पुस्तके वाचत असू. बसल्या बठकीला पुस्तके वाचून संपविणे मला फारसे आवडत नसे. त्यामुळे त्या पुस्तकाचे आणि लेखकाच्या विचारांचे रसग्रहण पूर्णपणे होईपर्यंत मी निवांतपणे, पण तितकेच सखोल वाचन करीत असे.

महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर, सातारा आणि त्यानंतर पुण्यामध्ये पूर्ण केले. लहानपणापासूनच वक्तृत्व स्पर्धामध्ये सहभागी होत असल्याने लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर अशा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची पुस्तके वाचनात आली. ‘स्वराज्य की सुराज्य’, ‘आगरकर आणि स्त्री शिक्षण’ अशा विविध विषयांवर वक्तृत्व स्पध्रेमध्ये बोलताना पूर्वी केलेल्या वाचनाचा मला सर्वाधिक उपयोग झाला. लहानपणी इंग्रजीमधील पुस्तकांचे फारसे वाचन झाले नाही. मात्र, १९६० मध्ये पुण्यामध्ये वास्तव्याला आल्यानंतर स. प. महाविद्यालयातून बी.एस्सी.चे शिक्षण पूर्ण झाले आणि मी सन्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सन्यामध्ये असलेल्या ३५ वर्षांच्या काळात लष्करी इतिहास, डावपेच, युद्धनीती, शस्त्रास्त्रांविषयीच्या नानाविध पुस्तकांचे वाचन केले. माझ्या वाचनप्रवासात प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धाविषयीचे सर्व खंड, ‘द पाईन वॉरियर्स’, ‘शिवाजी-हिज् लाईफ अँड टाईम्स’, ‘मराठी रियासत’चे आठ खंड, ‘युद्धमीमांसा’, ‘द आर्ट ऑफ वॉर’, ‘फायटिंग टू द एंड’, ‘मराठा आरमार’ अशा नानाविध पुस्तकांचा त्यामध्ये समावेश आहे.

लष्करी सेवेत असताना नागालँड, पंजाब, जम्मू-काश्मीर, चेन्नई, सिक्कीम, मेरहठ, सिमला या ठिकाणांसह निवृत्तीनंतर श्रीलंकेमध्येही मी होतो. त्या कालखंडात माझ्याकडून कळत-नकळत पुस्तकांची खरेदी होत होती. लष्करी ठाणी असलेल्या ठिकाणची ग्रंथालये आणि वाचनालये प्रचंड समृद्ध आहेत. त्यामुळे अभियांत्रिकीविषयी पुस्तके वाचण्यासाठी मी लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये (सीएमई) आवर्जून जात असे. तब्बल ३५ वर्षे लष्करामध्ये विविध पदांवर सेवा दिल्यानंतर युद्धनीती, लष्करी सराव आणि इतर अनेक गोष्टींचे मला ज्ञान अवगत होते. त्यामुळे ठिकठिकाणी व्याख्याने आणि चर्चासत्रांमधून हे ज्ञान आजच्या पिढीसमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतर भारतासंबंधीच्या युद्धांच्या अनेक नोंदी व टिपणे मी यानिमित्ताने वाचनादरम्यान काढून ठेवली. त्यामुळे पाकिस्तान, चीन व संबंधित देशांविषयी बोलताना मला ते संदर्भ अत्यंत उपयोगी पडले. व्याख्याने आणि चर्चासत्रांप्रमाणे एकीकडे माझा लेखनप्रवासही सुरू झाला. कारगिलचे युद्ध सुरु असतानाच, चालू परिस्थितीविषयी वर्तमानपत्रामधून लिहिण्यातून माझी लेखनाची सुरुवात झाली. त्यामुळे दररोज रात्री दूरचित्रवाणी आणि इतर ठिकाणांहून आलेल्या चालू घडामोडींच्या माहितीविषयी मी वर्तमानपत्रातून लेखन करण्यास सुरुवात केली. याशिवाय अफगाणिस्तान, इराक यासंबंधी दीड वर्षांहून अधिक काळ मी ‘लोकसत्ता’सह विविध वर्तमानपत्रांमधून लेखन करीत होतो. कारगिल युद्धाविषयी आणखी सखोल व उत्तम लेखन करावे, यासाठी राजहंस प्रकाशनकडून मला प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे ‘डोमेल ते कारगिल’ हे पुस्तक मी लिहू शकलो. त्याकरिता त्याविषयाशी केंद्रित सखोल वाचन होणे आवश्यक होते. राजकीय नीती, सामाजिक नीती आणि इतिहास याविषयी अनेक पुस्तके मी वाचून काढली. तब्बल दोन वष्रे मी यावर काम केल्यानंतर २००१ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले. इंटरनेटच्या माध्यमातूनही वेळोवेळी वाचन सुरूच होते.   एखाद्या पुस्तकाचे विस्तृत वाचन करण्याचा मोह आजही मला आहे. त्यामुळे माझ्या बुकशेल्फमधील पुस्तकांची संख्या मर्यादित असली, तरी मी वाचलेल्या पुस्तकांतील बारकावे आणि घटनाक्रम अगदी ठामपणे मांडू शकतो. आपण एखादे पुस्तक वाचून किती लवकर संपवितो, यापेक्षा ते पुस्तक सखोलपणे वाचून त्या लेखकाचे विचार किती समजून घेतो हे महत्त्वाचे आहे. लेखनाला वाचनातून न्याय देण्याचा प्रयत्न हा प्रत्येक वाचकाने करायला हवा. ‘डोमेल ते कारगिल’ या पुस्तकाप्रमाणेच आणखी काही पुस्तकांचे लेखन माझ्या हातून झाले. त्यामध्ये प्रामुख्याने ‘श्रीलंकेची संघर्षगाथा’ या पुस्तकाचा समावेश आहे. श्रीलंकेमध्ये सुरुंग निकामी करण्याच्या कामाकरिता मी निवृत्तीनंतर ‘होरायझन’ या भारतीय संस्थेच्या माध्यमातून गेलो होतो. त्या दरम्यान २००९ मध्ये प्रभाकरन् मारला गेला आणि त्यानंतर मी श्रीलंकेची संघर्षगाथा हे पुस्तक लिहिले. श्रीलंकेत त्या वेळी असलेली राजकीय, लष्करी आणि सामाजिक परिस्थिती मी पाहिली होती. त्यासोबतच प्रत्यक्ष काम केले असल्याने मला या सगळ्या गोष्टींचा जवळून अनुभव होता. त्यामुळे हे वेगळ्या प्रकारचे लेखन माझ्या हातून घडू शकले. तसेच ‘१९६२ च्या युद्धानंतर’, ‘न सांगण्याजोगी गोष्ट – ६२ च्या पराभवाची शोकांतिका’ हे पुस्तक मी लिहिले. तसेच ‘अ‍ॅडमिरल भास्कर सोमण-नौसेनेचे सरखेल’ या मी लिहिलेल्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवादही नंतर प्रकाशित झाला.

लष्करी सेवेत असल्याने त्याकाळात मी ललित वाचनाला मुकलो, हे तितकेच खरे आहे. परंतु आता पत्नी आणि दोन्ही मुले प्रचंड वाचन करीत असल्याने पुस्तकांचा मेळा घरामध्ये दररोज भरतो. पुस्तकांची खरेदी मोठया प्रमाणात होत असल्याने माझ्यासह आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे बुकशेल्फ पुस्तकांनी समृद्ध आहे. आमच्याकडे ऑनलाईन पद्धतीने पुस्तकांची खरेदी होते. सनिकी नेतृत्वावर पुस्तक लिाहावे, असे मला वाटले. त्यामुळे बाजीराव पेशवे यांच्याविषयी अनेक पुस्तके मी वाचली असून त्यावर नेहमीप्रमाणे नोंदी काढत गेलो. माझ्या बुकशेल्फमध्ये ‘मनोबोध’, ‘आव्हान – जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे’, ‘१९६२ द वॉर दॅट वॉझंट’, ‘द इंडियन नेव्ही’, ‘द ब्लड टेलिग्राम’, ‘काश्मीर-एक शापित नंदनवन’, ‘कायदे आझम’, ‘ययाती’ यांसारखी अनेक पुस्तके आहेत. विविध ठिकाणी व्याख्यानांना गेल्यानंतर भेट म्हणून मिळणारी पुस्तके आणि प्रस्तावना लिहिण्याकरिता अनेक पुस्तके येतात. त्यामुळे पुस्तकांचा सहवास आमच्या कुटुंबातील प्रत्येकाला मोठया प्रमाणात लाभत आहे. एक लष्करी अधिकारी म्हणून माझे वाचन त्या विषयापुरते मर्यादित असले, तरी अनेक लष्करी अधिकारी आपल्या आवडीनुसार नानाविध प्रकारची पुस्तके मोठय़ा प्रमाणात वाचतात. परंतु लष्कराविषयी घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी आणि घटनांविषयी अभ्यासाची आवड मला असल्याने माझ्या वाचनप्रवासात या पुस्तकांचा मोठया प्रमाणात समावेश आहे.