महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणार असलेल्या महापौर चषक क्रीडा स्पर्धावर टीका होत असल्यामुळे आता ही स्पर्धा होईल; पण अनावश्यक खर्च टाळून किमान खर्चात ही स्पर्धा भरवली जाईल. क्रीडा संघटनांच्या प्रस्तावातील अवास्तव खर्चाची तपासणी करून खर्चाचा फेरप्रस्ताव तयार केला जाईल, असे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी बुधवारी जाहीर केले.
महापौर चषक क्रीडा स्पर्धा या उपक्रमांतर्गत सव्वीस क्रीडा स्पर्धा होणार असून त्यासाठी दोन कोटी ४४ लाख रुपये खर्च होणार आहेत. या खर्चाला स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिल्यानंतर स्पर्धेवर जो खर्च होणार आहे व जी उधळपट्टी होणार आहे त्यावर टीका सुरू झाली असून स्पर्धेबाबतची भूमिका महापौरांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. विकासकामे कमी करून क्रीडा स्पर्धावर अवास्तव खर्च करणे योग्य नाही. त्या दृष्टीने स्पर्धेतील अवास्तव खर्च टाळले जातील, असे महापौरांनी सांगितले. प्रत्येक स्पर्धा ही त्या त्या क्षेत्रातील मान्यताप्राप्त संघटनेमार्फतच भरवली जाईल, असेही ते म्हणाले.
महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी क्रीडा मैदाने विकसित केली आहेत. त्यांचा वापर या स्पर्धासाठी केला जाईल. तसेच स्पर्धेतील कोणत्याही बाबीवर अवास्तव खर्च होणार नाही याची काळजी घेतली जाईल. असे वाढीव खर्च लक्षात आले तर ते रद्द केले जातील, असेही सांगण्यात आले. तसेच वकिलांच्या संघटनेतर्फे क्रिकेटचा जो सामना आयोजित करण्यात आला होता तो रद्द करण्यात आल्याचीही माहिती महापौरांनी दिली. या एका सामन्यावर दहा लाख रुपये खर्च केला जाणार होता.
या स्पर्धा भरवण्यासाठी त्या त्या क्रीडा संघटनांनी खर्चाचे जे आकडे दिले होते, त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात आला असला, तरी त्याची छाननी केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. महापालिकेच्या विविध विभागांमार्फत जी कामे केली जातात त्या कामांचेही खर्च प्रस्तावात दाखवण्यात आले होते. ती कामे महापालिकेच्या संबंधित विभागाकडूनच करून घेतली जातील, असेही ते म्हणाले. महापौर चषक क्रीडा स्पर्धेत सव्वीस खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन असले, तरी त्यातील काही क्रीडा प्रकार असे आहेत की त्या स्पर्धेत फार कमी खेळाडू भाग घेतात. खेळाडूंचा प्रतिसाद नसला, तरी स्पर्धा पार पाडली जाते. अशा खेळांची यादी तयार केली जाणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.
मान्यताप्राप्त संघटनेमार्फतच स्पर्धा भरवा
महापौर चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करताना होणारा कोटय़वधींचा खर्च अयोग्य आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता अंकुश काकडे यांनीही केली आहे. प्रत्येक खेळाची स्पर्धा संबंधित मान्यताप्राप्त संघटनेतर्फे व कमीत कमी खर्चात भरवावी, असे पत्रही काकडे यांनी बुधवारी महापौरांना दिले.