मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांची माहिती

दोन वर्षांपूर्वी माळीण गावात झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती. या दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचे काम शासनाच्या सर्व विभागांनी योग्य समन्वय राखत तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांनी नुकत्याच दिल्या. या दुर्घटनेतील बाधितांना दिवाळीपर्यंत घरे देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

भूस्खलनात दुर्घटनाग्रस्त झालेल्या पुणे जिल्ह्य़ातील माळीण (ता. आंबेगाव) गावच्या नवीन पुनर्वसन कामाची पाहणी मुख्य सचिव क्षप्रतिनिधी, पुणेत्रीय यांनी केली. या वेळी त्यांनी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना पुनर्वसनाचे काम तातडीने पूर्ण करण्याविषयी सूचना केल्या. जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. माळोदे, प्रांताधिकारी कल्याण पांढरे, तहसीलदार बी. जे. गोरे,  माळीणचे सरपंच दिगंबर भालचीम आदी उपस्थित होते. क्षत्रीय म्हणाले, माळीण गावात झालेल्या दुर्घटनेतील जीव गमवावा लागलेल्यांचे नुकसान कधीही भरून निघणार नाही. मात्र या गावातील बाधित कुटुंबांचे योग्यप्रकारे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. शासन यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या नवीन गावठाणात बाधितांसाठी देण्यात येणारी घरे ही अ‍ॅल्युफोर या नव्या तंत्रज्ञानाने बांधण्यात आली आहेत. ही घरे पारंपरिक बांधकाम केलेल्या घरांपेक्षा चारपट अधिक मजबूत आहेत. या नवीन गावठाणाची योग्यप्रकारे रचना करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक शाळा, पिण्याच्या पाण्याची टाकी, सार्वजनिक गोठा, ग्रामपंचायतीची इमारत, दवाखाना, सांडपाण्याची सोय अशा सुविधा देण्यात येणार आहेत. प्रत्येक कुटुंबाला ४५० स्क्वेअर फूट इतक्या आकाराची एकसारखी घरे देण्यात येणार आहेत.