भटक्या कुत्र्यांचा वाद

भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिकेची गाडी बोलाविल्यानंतर झालेल्या वादातून श्वानप्रेमी तरुणी आणि तिच्या आईला शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्याची घटना कोथरूडमधील महात्मा सोसायटीत रविवारी (२५ सप्टेंबर) घडली. या प्रकरणी एका रहिवाशाला कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने मंगळवापर्यंत (२७ सप्टेंबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मिलिंद मधुकर काळे (वय ४५, रा. महात्मा सोसायटी, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या संदर्भात एका वीस वर्षीय तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांनी दिली. तक्रारदार तरुणी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आहे. दोन महिन्यांपूर्वी महात्मा सोसायटी भागात एका भटक्या कुत्रीने चार पिलांना जन्म दिला होता. दरम्यान, कुत्रीचा मृत्यू झाला. त्यानंतर चार पिलांचे संगोपन तक्रारदार तरुणी आणि तिच्या आईने केले. सोसायटीच्या आवारात भटकी कुत्री असल्याने तक्रारदार तरुणी आणि तिच्या आईसोबत काही दिवसांपूर्वी काळेंचा वाद झाला होता. या कारणावरून काळेंनी तरुणीला त्रास दिला होता, असे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

काळेंनी महापालिकेच्या गाडीला रविवारी दुपारी सोसायटीत बोलाविले. भटकी कुत्री पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दोन पिले पकडली.

पिले लहान असल्याने त्यांना पकडू नये, असे तरुणीने सांगितले. या कारणावरून पुन्हा काळे आणि तरुणीमध्ये वाद झाला. काळेंनी तरुणी आणि तिच्या आईला धक्काबुक्की केली. काळेंनी केलेल्या धक्काबुक्कीत तरुणीचा दात तुटला. त्यानंतर काळे तेथून पसार झाले. तरुणी आणि तिच्या आईवर रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याने मारहाण टिपली

मिलिंद काळेंनी तरुणी आणि तिच्या आईला बेदम मारहाण केली. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत या घटनेचे चित्रीकरण झाले. दोघींना मारहाण करून दुचाकीवरून पसार होताना काळे तरुणीच्या आईच्या अंगावर थुंकला. काळेंना पकडून पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सहायक सरकारी वकील अ‍ॅड. एस. सी. शिंदे यांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.