अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला विशेष न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी दहा वर्षे सक्तमजुरी आणि ४७ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मुलीला तिच्या इच्छेविरोधात विवाहासाठी बळजबरी करणाऱ्या आरोपीच्या वडिलांना न्यायालयाकडून पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या खटल्यात आरोपी विठ्ठल श्रीरंग कांबळे (वय ३५, रा. दत्तवाडी) याला अपहरण तसेच बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्याचे वडील श्रीरंग कांबळे (रा. थेरवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांना पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सन २०१५ मध्ये विठ्ठल कांबळे याने शुक्रवार पेठ भागातून सतरावर्षीय मुलीला विवाहाच्या आमिषाने पळवून नेले होते. मुलीच्या आईने या बाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी कांबळे याला पकडले होते. या खटल्यात पीडित मुलीची साक्ष तसेच वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. सहायक सरकारी वकील अ‍ॅड. शुभांगी देशमुख यांनी सहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या होत्या. खटल्याच्या कामकाजासाठी उपनिरीक्षक मीना तडवी यांनी साहाय्य केले. आरोपी विठ्ठल आणि त्याचे वडील श्रीरंग मुलीच्या आईच्या ओळखीचे होते. त्यांनी मुलीला फूस लावून पळवून नेले होते. न्यायालयाने साक्षी तसेच पुरावे ग्राहय़ धरून आरोपींना शिक्षा सुनावली. सबळ पुराव्याअभावी आरोपी विठ्ठल याच्या आईची निदरेष मुक्तता करण्यात आली.