मुलीचा छळ करणाऱ्या जावयाच्या डोक्यात सासऱ्याने दगड घातल्याने जावयाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील हिंजवडीमध्ये घडली आहे. संतापाच्या भरात घडलेल्या या घटनेत सासऱ्याविरोधात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हिंजडीमध्ये राहणा-या शहादेव माळी (वय ३३ वर्ष) याचे भाऊसाहेब राजपूत यांची मुलगी अंजनाशी लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर शहादेव पत्नी अंजनाला मारहाण करु लागला. रविवारी रात्रीदेखील मद्यधूंद अवस्थेत आलेल्या शहादेवने अंजनाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. हा प्रकार समजताच सासरे भाऊसाहेब हे जाब विचारण्यासाठी मुलीच्या घरी गेले. मद्यधूंद शहादेवने राजपूत यांच्याशीही वाद घातला.  ‘तुला माज आला आहे का? माझ्या पोरीला का मारतोस ? असे सांगत भाऊसाहेब राजपूतने  शहादेवच्या डोक्यात दगड घातला. यात गंभीर झालेल्या शहादेवचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशीरा भाऊसाहेब राजपूतविरोधात भारतीय दंड विधानातील कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप भाऊसाहेबला अटक करण्यात आलेली नाही.