साथीदारांच्या मदतीने साडूने केलेले कृत्य
पिंपरीतील एका तरुणाचे अपहरण करुन त्याचा खून केल्यानंतर मृतदेह ताम्हिणी घाटात टाकल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तरुणाचा खून केल्याप्रकरणी तरुणाचा साडू आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली. खुनामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पिंपरी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
विनोद विठ्ठल उपदेशी (वय २८, रा. वैशाली हौसिंग सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा साडू राहुल नामदेव डोंगरे (वय ३०, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव), सनी प्रकाश माने (वय २०,रा.पुलाची वाडी, डेक्कन), संकेत अशोक खंडागळे (वय २६, रा. पोलीस वसाहत, शिवाजीनगर) यांना अटक करण्यात आली.
उपदेशी याचे अपहरण झाल्याची तक्रार त्याचा मित्र आदित्य साळवे याने गुरूवारी ( २५ ऑगस्ट) पिंपरी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी या गुन्ह्य़ाचा तपास सुरु केला होता.
पोलीस हवालदार शाकीर जिनेडी यांना उपदेशीचे अपहरण त्याचा साडू डोंगरे आणि साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी तपास करुन तिघांना पकडले. डोंगरेकडे चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने उपदेशीचा मृतदेह ताम्हिणी घाटातील दरीत टाकलय़ाचे सांगितले. पोलिसांनी लोणावळ्यातील शिवदुर्ग गिर्यारोहण संस्थेतील गिर्यारोहकांची मदत घेऊन मृतदेह दरीतून बाहेर काढला.
पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक आयुक्त राम मांडुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक एम.जी.
काळे, सहायक निरीक्षक मुंढे, उपनिरीक्षक हरीष माने, अंतरकर, बुधकर, शाकीर जिनेडी, जावेद पठाण, भोसले, टाकळकर, धस, आढारी, वानखेडे यांनी ही कारवाई केली.