शाळेत संस्कृतचा पेपर लिहिताना दुरून ऐकू येणाऱ्या ‘कौसल्येचा राम’ आणि ‘सावळाच रंग तुझा’ या माणिकताईंच्या गीतांनी हरपलेले भान.. केशवराव भोळे आणि यशवंत देव यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच ‘शब्दांतील भावना सुरांतून आल्याच पाहिजेत’ या भावनेतून गायिलेले प्रत्येक गीत.. कारकिर्दीच्या शिखरावर असताना थांबविलेले पाश्र्वगायन.. या आठवणींबरोबरच ‘नाविका रे’, ‘शब्द शब्द जपून ठेव’, ‘समाधी घेऊन ज्ञानदेव गेले’ अशा गीतांच्या माध्यमातून रसिकांनी बुधवारी सुमन सुगंध अनुभवला.  
पुणे भारत गायन समाज आणि माणिक वर्मा प्रतिष्ठान यांच्यातर्फे ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते ज्येष्ठ पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर यांना माणिक वर्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेत्री भारती आचरेकर, वंदना गुप्ते, पाश्र्वगायिका राणी वर्मा, डॉ. अरुणा राजशेखर या माणिक वर्मा यांच्या कन्यांसह ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आणि पुणे भारत गायन समाजाच्या अध्यक्षा शैला दातार या वेळी उपस्थित होत्या.  http://www.manikvarma.comया संकेतस्थळाचे उद्घाटन पं. चौरासिया यांच्या हस्ते झाले. उत्तरार्धात मंगला खाडिलकर यांनी सुमन कल्याणपूर यांच्याशी संवाद साधला. तर, मंदार आपटे, मधुरा दातार आणि दीपिका जोग-दातार यांनी कल्याणपूर यांची गीते सादर केली.
मी जी भावगीते, भक्तिगीते, चित्रपटगीते गायले ती रसिकांना आवडली. त्या सगळ्या गाण्यांचा आणि माझ्या गानकलेचा हा सन्मान आहे. हा पुरस्कार म्हणजे माणिकताईंचा आशीर्वाद आहे, अशी भावना सुमन कल्याणपूर यांनी व्यक्त केली. निकोप वातावरणात सुरांमध्ये मी रमले. आता थांबायला हवे असे वाटल्याने पाश्र्वगायनापासून दूर गेले. आता घरी देवीसमोर बसून गाते. देवीनेच दिलेला आवाज आहे. त्यामुळे गाताना आवाज छान लागतो, असे त्यांनी सांगितले.
माणिक वर्मा आणि सुमन कल्याणपूर या दोन्ही घराशी माझा ऋणानुबंध असल्याचे पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी सांगितले. उमेदीच्या काळात ‘खूब सिखो’ हा आशीर्वाद देत माणिकताईंनी प्रोत्साहन दिल्याची आठवण त्यांनी जागविली. पेटीवादक, दौऱ्यांमधील सहगायक आणि संगीतकार अशा तिहेरी भूमिकेतून मी सुमनताईंबरोबर काम केले असल्याचे अशोक पत्की यांनी सांगितले.