गुरुतुल्य अशा ज्येष्ठ कलाकाराच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही कोणत्याही कलाकाराच्या जीवनातील आनंददायी गोष्ट असते, अशी भावना बनारस घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. राजन-साजन मिश्रा यांनी रविवारी व्यक्त केली.
पुणे भारत गायन समाजाचे संस्थापक गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते पं. राजन-साजन मिश्रा यांना ‘माणिक वर्मा स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. समाजाचे उपाध्यक्ष रवींद्र जोशी, सुहास दातार, माणिक  वर्मा यांच्या कन्या अभिनेत्री वंदना गुप्ते आणि गायिका राणी वर्मा या वेळी उपस्थित होत्या.
पं. राजन-साजन मिश्रा म्हणाले,‘‘माणिकताई बनारसला नेहमी येत असत. त्यांच्या गायनाला आमचे काका पं. गोपाल मिश्रा आणि वडील पं. हनुमान मिश्रा यांनी साथसंगत केली होती. संगीताच्या क्षेत्रामध्ये विद्वता संपादन केलेल्या माणिकताई अतिशय साधेपणाने वावरायच्या. त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकता आले. म्हणूनच माणिकताईंच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराची स्मृती आयुष्यभर जपून ठेवावी अशीच आहे. जीवनाच्या अखेपर्यंत गाण्याची शक्ती अबाधित रहावी ही मनीषा पूर्ण होण्यासाठी रसिकांनी आशीर्वाद द्यावा.’’
पं. भास्करबुवांच्या पारंपरिक बंदिशी आणि या बंदिशींवर बेतलेल्या नाटय़पदांवर आधारित ‘विरासत’ हा कार्यक्रम शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी कुलकर्णी यांनी सादर केला. ‘सुजन कसा मन चोरी’, ‘मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला’ ही पदे त्यांनी गायली. त्यांना राहुल गोळे यांनी संवादिनीची आणि समीर पुणतांबेकर यांनी तबल्याची साथ केली. उत्तरार्धात मंगेश वाघमारे यांनी पं. राजन-साजन मिश्रा यांच्याशी संवाद साधला.