संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे प्रतिपादन

देशाविरोधात बोलणे, देशाचा अपमान होईल, असे वक्तव्य करणे अशा घटना सध्या देशात सातत्याने घडत आहे. देशाविरोधात बोलण्याची हिंमत होतेच कशी, असा सवाल करत देशाविरोधात बोलणाऱ्यांना एखाद्या अभिनेता वा ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीप्रमाणेच धडा शिकवायला हवा, असे स्पष्ट प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी शनिवारी येथे बोलताना केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरआणि भारत शक्ती डॉट कॉमतफे  संरक्षण विश्लेषक  नितीन गोखले यांच्या ‘बियाँड एन.जे. ९८४२ : द सियाचीन सागा’ या  पुस्तकाच्या ‘सियाचिनचे धगधगते हिमकुंड’ या मराठी अनुवादाचे प्रकाशन पर्रिकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रामनाथ गोएंका पुरस्कार समारंभात बोलताना अभिनेता आमिर खान याने देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांचा उल्लेख करत देश सोडण्याचे विचार घोळत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे आमिरवर टीकेची झोड उठली होती. तसेच तो ज्या ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीची जाहिरात करत होता, त्या कंपनीवरही अनेकांनी बहिष्कार टाकला होता. पर्रिकर यांनी आमिर आणि स्नॅपडील या ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीचा नामोल्लेख टाळत  देशाविरोधात बोलणाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला.

आपल्या देशाचे सन्यदल बलशाली असून प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान हवा. मी सन्यातील जवानाकडे केवळ सरकारी नोकर म्हणून पाहात नाही, तर देशाचे रक्षणकत्रे म्हणून पाहतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सेनेतील जवान देशाच्या सीमेचे अहोरात्र संरक्षण करत असतात. भारतीय सन्यावर माझा पूर्ण विश्वास असून त्यांची योग्य ती काळजी घेण्यास संरक्षण खाते समर्थ आहे. शस्त्रे कशी वापरावीत हे भारतीय सन्याला शिकविण्याची मला गरज नाही, अशा शब्दांत पर्रिकर यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

देशाविरोधात बोलण्याचे प्रकार श्रीनगरमध्ये नाही तर दिल्लीत बसून केले जातात. कोणाचे तरी पाठबळ असल्याशिवाय या गोष्टी शक्य होत नाहीत.

– मनोहर पर्रिकर, संरक्षणमंत्री