शोध मोहिमेबाबत माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देणार

अलीकडेच चेन्नई येथील तांबारम हवाईतळावरून पोर्ट ब्लेअरकडे जाताना बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या विमानातील पिंपरीचे फ्लाइट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे यांच्या कुटुंबीयांची संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी शनिवारी भेट घेतली. बारपट्टे हे त्या विमानात नेव्हिगेटर म्हणून काम करीत होते. र्पीकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी बोलताना सहवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, या घटनेने मलाही धक्का बसला आहे, ते भारतीय हवाई दलातील एक सुरक्षित व चांगले विमान होते. ते बेपत्ता कसे होऊ शकते यावर माझाही विश्वास बसत नाही, परिस्थितीवर मी व्यक्तिगत लक्ष ठेवून आहे. र्पीकर यांनी कुणाल यांचे वडील राजेंद्र यांची भेट घेऊन माहिती दिली. ते म्हणाले की, हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना दुर्घटनाग्रस्त विमानातील जवानांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे, विमान बेपत्ता असून ते सापडलेले नाही. शोध मोहिमेतील माहिती वेळोवेळी संबंधितांच्या कुटुंबीयांना दिली जाईल.

बारपट्टे यांच्या आई-वडिलांनी र्पीकर यांच्याकडे अशी तक्रार केली की, विमान बेपत्ता झाल्याच्या बातमीनंतर आम्हाला कुठलीही माहिती देण्यात आली नाही, भारतीय हवाई दलाच्या सुलान येथील तळावरून कोणतीही माहिती मिळाली नाही. र्पीकर यांना एका नातेवाईकांनी विमान बेपत्ता झाल्यानंतर तीस तासांनी अधिकृत संपर्क क्रमांक मागणारा ट्विट केला होता. २२ जुलैला भारतीय हवाई दलाचे विमान २९ जणांसह बेपत्ता झाले त्यात चार अधिकारी होते. त्या विमानाने चेन्नईच्या तांबारम हवाईतळावरून पोर्ट ब्लेअरकडे जाण्यासाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या सोळा मिनिटात ते बेपत्ता झाले होते. भारतीय हवाई दलाचे अँटोनोव ३२ म्हणजेच एएन ३२ हे विमान अलीकडेच दुरुस्त करण्यात आले होते व नंतर त्याचे हे उड्डाण झाले त्यानंतर ते बेपत्ता झाले.