पुरणपोळीचे भोजन, मन रमविणाऱ्या नाटय़संगीताचे श्रवण आणि सांस्कृतिक भूक भागविणाऱ्या दिवाळी अंकाचे वाचन ही मराठी माणसाची ओळख. १९०९ मध्ये ‘मनोरंजन’पासून दिवाळी अंकाची सुरुवात झाली. त्या वेळी या अंकाची किंमत एक रुपया होती. दिवसेंदिवस वाढत जात असलेल्या महागाईमुळे शंभर वर्षांनंतर या अंकाची किंमत १२० रुपये झाली. तर, १०५ वर्षांत ही महागाई दीडशे पट झाली आहे.
काशिनाथ रघुनाथ ऊर्फ का. र. मित्र यांनी सुरू केलेल्या ‘मनोरंजन’ मासिकाने चार दशके महाराष्ट्राचे सांस्कृतिक भरणपोषण केले. १९०९ मध्ये ‘मनोरंजन’ने २५० पृष्ठांचा पहिला दिवाळी अंक प्रकाशित केला. हा दिवाळी अंक परंपरेचा प्रारंभ आहे. गेल्या शंभर वर्षांत दिवाळी अंक ही संकल्पना वाचकांमध्ये रुजली. एवढेच नव्हे तर, दिवाळी अंकांच्या संख्येत वाढ झाली. वाचकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत दिवाळी अंकाच्या शताब्दीचे औचित्य साधून ‘अक्षरधारा’ने ‘मनोरंजन’ या अंकाचे पुनप्र्रकाशन केले होते. त्या वेळी प्रकाशित झालेल्या ‘मनोरंजन’च्या पाच हजार प्रती अवघ्या पाच दिवसांतच संपल्या. पूर्वी एक रुपया किंमत असलेला हा दिवाळी अंक शताब्दी वर्षांमध्ये १२० रुपयांना होता. याचाच अर्थ ही महागाई १२० पट झाली. तर, आता पुन्हा एकदा हा दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, पाच वर्षांत महागाई वाढल्यामुळे या अंकाची किंमत १५० रुपये ठेवण्यात आली असल्याची माहिती रमेश राठिवडेकर यांनी दिली. दिवाळी अंक हे प्रतीक विचारात घेतले, तर शंभर वर्षांत १२० पटीने तर, १०५ वर्षांत १५० पटीने महागाई वाढली आहे.