नाटय़, नृत्य आणि संगीत या प्रायोगिक कलांमध्ये वेगवेगळे प्रयोग (एक्सपेरिमेंट) करणाऱ्यांना त्यांच्या आविष्कारासाठी थिएटर अ‍ॅकॅडमीच्या संकल्पनेतून स्वतंत्र नाटय़संकुल साकारले जात आहे. महाराष्ट्र मंडळाच्या मुकुंदनगर येथील शेठ दगडूराम कटारिया हायस्कूल प्रांगणामध्ये केवळ कलांच्या सादरीकरणासाठीचे संकुल उभारण्यात येत आहे.
सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये प्रायोगिक नाटय़चळवळ जोमात कार्यरत आहे. मात्र, प्रायोगिक नाटकांच्या सादरीकरणासाठी सुदर्शन रंगमंच आणि टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृह वगळता स्वतंत्र रंगमंच अस्तित्वात नाही. महाराष्ट्रामध्ये नृत्याचे शिक्षण देणाऱ्या सर्वाधिक संस्था पुण्यामध्ये आहेत. मात्र, केवळ नृत्यासाठी स्वतंत्र सभागृहदेखील बांधणे महापालिकेला शक्य झालेले नाही. ‘लोकसत्ता’ने या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. या पाश्र्वभूमीवर ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’च्या संकल्पनेतून प्रायोगिक कलांमध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्यांसाठी स्वतंत्र संकुल उभारले जात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांनी दिली.
भरतमुनींना अभिप्रेत असलेले नाटक या संकल्पनेवर आधारित चारशे आसनक्षमतेचे प्रेक्षागृह या संकुलामध्ये असेल. त्याचप्रमाणे रंगमंचीय अवकाशाचे बंधन नको अशा संकल्पनेतून काम करणाऱ्यांसाठी येथे दोन मोकळ्या जागा (ओपन स्पेस) राखून ठेवण्यात आल्या आहेत. चित्रकला, व्यंगचित्रकला, छायाचित्रकला, शिल्पकला यामध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्यांसाठी कलादालन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संकुलाच्या उभारणीचे काम प्रसिद्ध वास्तुविशारद अविनाश नवाथे यांच्याकडे आहे. साहित्य अकादमीचा बालसाहित्याचा पुरस्कार लाभलेल्या लेखिका आणि ज्येष्ठ रंगकर्मी माधुरी पुरंदरे यांच्या हस्ते रविवारी (७ जून) सकाळी दहा वाजता या संकुलाचे भूमिपूजन होणार असून दोन वर्षांत ते पूर्णत्वास जाईल, असे प्रसाद पुरंदरे यांनी सांगितले.
रंगकर्मी आणि प्रेक्षक अशा दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीने प्रायोगिकता तपासून घेता येतील अशा रितीने ही वास्तू साकारण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थी आणि प्रायोगिक स्वरूपात काम करणाऱ्या संस्थांना याचा फायदा घेता यावा हाच त्यामागचा उद्देश आहे. थिएटर अ‍ॅकॅडमीच्या संकल्पनेतील प्रयोग घडावेत, प्रायोगिक तत्त्वावर काम करणाऱ्या कलाकारांना कमीत कमी खर्चात रंगमंच उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. मुंबईमध्ये छबिलदास आणि पृथ्वी थिएटरभोवती नाटय़चळवळ उभी राहिली. त्याच धर्तीवर पुण्यामध्ये प्रायोगिक कलांची चळवळ व्हावी आणि त्याची व्याप्ती राज्यभर असावी, ही या वास्तुप्रकल्पामागची मुख्य भूमिका आहे, याकडेही प्रसाद पुरंदरे यांनी लक्ष वेधले.