अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेल्या कलाकार आणि तंत्रज्ञांची मांदियाळी घडविणाऱ्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) संस्थेच्या नियामक मंडळाचे भूषविलेले अध्यक्षपद.. चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीवर असताना अचानक संन्यास घेऊन ओशो आश्रमात केलेली साधना.. ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त प्रदान करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार.. एकूणच विनोद खन्ना यांच्या कारकीर्दीत पुण्याचे विशेष योगदान ठरले आहे.

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना ‘एफटीआयआय’मध्ये दुपारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला, चित्रपट संशोधन अधिकारी चंद्रशेखर जोशी, निर्मिती व्यवस्थापक के. ए. शेख यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. विनोद खन्ना यांची मध्यवर्ती भूमिका असलेला गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला ‘अचानक’ हा चित्रपट दाखविण्यात आला. विनोद खन्ना यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास उलगडणारे छायाचित्र प्रदर्शन या वेळी भरविण्यात आले होते.

दिग्गज अभिनेता असूनही विनोद खन्ना यांच्या वागण्यात साधेपणा होता. मी कोणी मोठा कलाकार आहे, अशी प्रौढी त्यांनी कधीच मिरवली नाही, अशा शब्दांत कँथोला यांनी भावना व्यक्त केली. ऑक्टोबर २००१ ते मार्च २००५ या कालावधीत विनोद खन्ना यांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषविले होते. साडेचार वष्रे त्यांचे संस्थेशी नाते जुळले होते. त्यांच्याशी सहज संपर्क साधता यायचा, अशी आठवण त्यांच्या काळात संस्थेमध्ये कार्यरत असलेले सहकारी सांगतात, असेही कँथोला यांनी सांगितले.

एफटीआयआयचे अध्यक्ष असताना त्यांनी संस्थेला भेट दिली होती. स्वभावातील साधेपणा हे त्यांचे वैशिष्टय़. त्यांच्या वागण्यात कोणताही रुबाब नव्हता. त्यांनी कधीच कोणालाही दुय्यम वागणूक दिली नाही, असे जोशी यांनी सांगितले. शेख म्हणाले, ‘एफटीआयआयचे अध्यक्ष असताना ही संस्था बंद पडणार नाही, अशी आश्वासकता त्यांनी सर्वामध्ये निर्माण केली. ते सर्वाशी मिळून-मिसळून वागायचे.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (पिफ) तीन वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विनोद खन्ना आणि ज्येष्ठ दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्या वेळी इतका मोठा कलाकार असलेल्या विनोद खन्ना यांच्यातील साधपेणाचा अनुभव सर्वानाच आल्याचे महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.