जन्मापासूनच सोबत आलेल्या ‘सायना बीफिडा’ या रोगाने अपंगत्वासोबत तिला मतिमंदत्वही दिले.. तिचे शारीरिक वय पंचवीस, पण बौद्धिक वय केवळ दहा ते बारा वर्षांचे.. शरीराने जगायला नकार दिला होता, पण आई-वडिलांच्या साथीने ती मोठय़ा जिद्दीने स्वत:च्या पायावर उभी राहिली.. तिची हीच कहाणी तिच्या आईने ‘तिची कहाणी वेगळी’ या पुस्तकात मांडली. याच पुस्तकाची विक्री करून ती आज स्वत:च्या उपचारांचा खर्च भागवित आहे.. दुर्दम्य इच्छाशक्तीची मनाली कुलकर्णी पिंपरीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही दाखल झाली असून, हसतमुखाने सर्वाना माहिती देत तिची पुस्तकविक्री सुरू आहे!
महिलांनी गाजविलेल्या कर्तृत्वाला सलाम करणाऱ्या ‘लोकसत्ता’मधील ‘नवदुर्गा’ उपक्रमांतर्गत २०१५ मध्ये मनालीच्या जिद्दीलाही सलाम करण्यात आला आहे. ठाणे येथील रहिवासी असलेल्या मनालीवर बालपणातच दहा ते १२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तिला एक किडनी नाही. व्हिलचेअरशिवाय हलताही येत नाही. पण, धडधाकट असणाऱ्या कुणालाही लाजवेल, असाच तिचा उत्साह आहे. शरीर तिला जगू देत नव्हते, तरीही सर्वावर मात करत तिने आयुष्याची वाटचाल यशस्वीपणे सुरू ठेवली. तिला विविध पुरस्कारांबरोबरच तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पारितोषिकही मिळाले आहे.
मनालीच्या थक्क करून टाकणाऱ्या प्रवासाची कहाणी तिची आई स्मिता कुलकर्णी यांनी ‘तिची कहाणी वेगळी’ या पुस्तकातून चितारली आहे. कुणी पुस्तक प्रकाशित करीत नव्हते, त्यामुळे स्वत:च प्रकाशन व विक्रीची जबाबदारी त्यांनी घेतली. हे पुस्तक घेऊन मनाली वेगवेगळ्या प्रदर्शनात जाते व त्यातून मिळालेल्या पैशातून उपचारांचा खर्चही भागवते. पिंपरीतील संमेलनात ग्रंथदालनामध्ये ‘ए विंग’मध्ये तिने पुस्तकाचे प्रदर्शन थाटले आहे. तिच्या या प्रदर्शनाला प्रतिसादही चांगला मिळतो आहे. येणाऱ्या प्रत्येकाला मनाली हसतमुखाने सामोरी जात पुस्तक व स्वत:विषयीही माहिती देते आहे.