नव्याने सुरू झालेल्या ८० टक्के शाळा इंग्रजी माध्यमाच्या

संस्थाचालकांनी आता मराठी माध्यमातील शाळा सुरू करण्याकडे जवळपास पाठच फिरवली आहे. पुणे शहर व जिल्हय़ात या शैक्षणिक वर्षांत सुरू होणाऱ्या शाळांपैकी ८० टक्क्यांहून अधिक शाळा या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. त्यातही केंद्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न शाळा सुरू करण्याकडे संस्थाचालकांचा अधिक ओढा दिसत आहे.

स्वयंअर्थसहायित शाळांच्या प्रस्तावांपैकी पात्र ठरलेल्या शाळांना शासनाने नुकतीच मंजुरी दिली. या शैक्षणिक वर्षांपासून (२०१६-१७) या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र नव्याने शाळा सुरू करताना किंवा त्याचा दर्जा वाढवताना संस्थाचालकांनी मराठी माध्यमाकडे जवळपास पाठ फिरवल्याचेच दिसत आहे. राज्यात सर्वाधिक नव्या शाळा आणि नवे वर्ग म्हणजेच शाळांचा दर्जावाढ पुणे जिल्हय़ात झाल्याचे दिसत आहे. पुणे जिल्हय़ात नव्याने सुरू झालेल्या आणि दर्जावाढ झालेल्या शाळांची संख्या ३३७ आहे. त्यापैकी २१० शाळा नव्याने सुरू झाल्या आहेत. यातील अवघ्या ३८ शाळा मराठी माध्यमाच्या आहेत, तर एक उर्दू माध्यमाची शाळा आहे. दर्जावाढ मिळालेल्या शाळांमध्ये ३३ शाळा मराठी माध्यमाच्या आहेत.

school-chart

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येही केंद्रीय शिक्षण मंडळाच्या किंवा इतर मंडळांच्या शाळा सुरू करण्याकडे संस्थाचालकांचा कल वाढत असल्याचे दिसत आहे. नव्याने सुरू झालेल्या शाळांमध्ये जवळपास

पन्नास टक्के शाळा या इतर मंडळांच्या आहेत. या वर्षी नव्याने सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या १७१ शाळांपैकी ७२ शाळा केंद्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न, १० शाळा आयसीएससीशी संलग्न आहेत, तर आयबी आणि आयजी या शिक्षणमंडळांशी प्रत्येकी एक शाळा संलग्न आहे. जिल्हय़ातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक शाळा सुरू करण्यासाठी संस्थाचालकांचे प्राधान्य असल्याचे दिसत आहे.

राज्यात या वर्षी ३ हजार ७४३ संस्थांना नवी शाळा किंवा दर्जावाढ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली हे जिल्हे वगळता इतर सर्व जिल्हय़ांमध्ये पन्नासपेक्षा अधिक नव्या शाळा सुरू होत आहेत. पुण्यासह, औरंगाबाद, सोलापूर, नगर, नाशिक या जिल्हय़ांमध्ये दोनशेपेक्षा अधिक संस्थांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.