भाषेची प्राचीनता, श्रेष्ठता आणि वाङ्मयीन परंपरेशी सलगता या निकषांवर मराठी भाषेचे श्रेष्ठत्व स्वयंभू आहे. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्वास अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक हरी नरके यांनी बुधवारी व्यक्त केला.
मराठी भाषा दिनानिमित्त शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमात नरके यांना मराठी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांच्या हस्ते नरके यांचा गौरव करण्यात आला. माजी उपकुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेता अशोक हरणावळ, पक्षाचे नेते श्याम देशपांडे, शिक्षण मंडळाचे सदस्य शिरीष फडतरे, राधिका हरिश्चंद्रे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मराठी भाषेचे श्रेष्ठत्व स्वयंभू असल्यामुळे कन्नड, तमिळ, तेलगू या भाषांप्रमाणेच मराठीला अभिमत भाषेचा दर्जा मिळावा या संदर्भातील दोनशे पानी अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे आणि मराठीला हा दर्जा मिळेलच, असे नरके यावेळी बोलताना म्हणाले. मराठी भाषेचे वय किमान अडीच हजार वर्षे आहे, असे राजारामशास्त्री भागवत यांनी १८७३ मध्ये तयार केलेल्या शोधप्रबंधात सर्वप्रथम सांगितले आहे. मराठी भाषेचा ब्राह्मी लिपीतील पहिला शिलालेख २२२० वर्षांपूर्वीचा आहे. हा शिलालेख जुन्नरजवळच्या नाणेघाटात सापडला आहे. यावरूनच ही भाषा प्राचीन आहे, हे सिद्ध होते, असेही नरके यांनी सांगितले.
मराठीचे श्रेष्ठत्व स्वयंभू आहे आणि या विषयावर चर्चेची गरजच नाही. मराठीत आज ५२ बोलीभाषा आहेत आणि या भाषेसाठी दरवर्षी अडीचशे संमेलने होतात. जगातील वीस हजार बोली भाषांपैकी सर्वाधिक बोलली जाणारी ही दहाव्या क्रमांकाची भाषा आहे, असे सांगून ते म्हणाले की, भाषेचा अभिमान बाळगणे म्हणजे अन्य भाषेचा द्वेष करणे नव्हे.
मराठी माणसेच मराठीचे नुकसान करतात. मराठी माणसांना मराठीतून स्वाक्षरी करावीशी वाटत नाही. आपणच भाषेचे नुकसान करत आहोत. त्यासाठी मराठीसंबंधी आपल्या मनात असलेला न्यूनगंड काढून टाकला पाहिजे, असे आवाहन मनोहर जोशी यांनी यावेळी बोलताना केले. सुधीर गाडगीळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि फडतरे यांनी आभार मानले.
 तर मी पुन्हा पुढाकार घेईन..
राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे यासाठी मी प्रयत्न केले होते आणि असे प्रयत्न करण्यासाठी उद्धव यांची संमती होती, असे कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मनोहर जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले की, यापुढेही ते दोघे तयार असतील, तर त्यांनी एकत्र येण्यासाठी मी पुढाकार घेईन. ते काम करण्यात मला आनंदच आहे आणि ते एकत्र यायला कोणाची हरकत असणार आहे?