दीपोत्सवाच्या धामधुमीत रमलेल्या आणि रंगलेल्या तमाम पुणेकरांची, एक तरी फेरी ज्या भागातून हमखास होतेच तो भाग म्हणजे तुळशीबाग, मंडई आणि बोहरी आळी! परिसरातील वाहतुकीची कोंडी, रस्त्यावरील अतिक्रमणे, वाहनांचे कर्कश आवाज, अशा सर्व अडचणींवर मात करून, पायी वा जमेल त्या वाहनाने विनातक्रार सहकुटुंब खरेदीचा आनंद लुटणारी मंडळी, याच गर्दीत दिसतात. खरेदीनंतर भेळपुरी, डोसा, कुल्फी असे सर्व काही चापणारी मंडळी याच प्रवाहात असतात. नेत्रदीपक अशा या बाजारपेठेचा एक भाग म्हणजे बोहरी आळी! अरुंद रस्ते, नव्या-जुन्या वास्तू, मालवाहतुकीच्या गाडय़ा, घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांची वर्दळ! व्यापाऱ्यांना पूरक सेवा देणारे व्यवसाय, प्रार्थनास्थळे, दवाखाने, औषधांची दुकाने, खाऊ गल्ल्या- असे सर्व काही बोहरी आळी आणि परिसरात सामावले आहे.

बोहरी आळी बाजारपेठेचा वेध घेताना पेशवाई काळातील नियोजनबद्ध शहर विकास समजून घ्यावा लागतो. शिवकाळात, कसबे पुणे अशीच ओळख असलेले पुणे, पेशवाई काळात वाढत्या लोकसंख्येबरोबर, त्या त्या भागातील विशिष्ट व्यापार उदीम, मंदिरे, सरदार मंडळींचे वाडे यांच्या आधारे वस्त्या विकसित झाल्या. पेठा वसवल्या गेल्या. विजयी वीरांच्या स्वागतासाठी गुढय़ा तोरणांबरोबर, रस्त्याकडेला भल्या मोठय़ा मेणबत्त्या खास बोहरी मंडळींकडून तयार करून घेऊन रोषणाई केल्याचे उल्लेख सापडतात, असे इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांनी सांगितले. कापडाचा व्यापार आणि देश-विदेशातील कापड व्यापाऱ्यांची जिथे वर्दळ वाढली ते क्षेत्र कापडगंज म्हणून सर्वपरिचित झाले. व्यापार, वर्दळ, वस्ती वाढल्यावर प्रासंगिक आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंची संभाव्य गरज ओळखून पूरक व्यवसाय सुरू झाले. बोहरी आळी आसपासच्या परिसरात आता सणवारांच्या वस्तूंबरोबरच, अगदी अंत्यविधीचे सामानसुद्धा उपलब्ध आहे. इथे मन:शांतीसाठी, प्रार्थनेसाठी मंदिरे आहेत, औषधोपचारासाठी दवाखाने आहेत. फिरस्त्यांसाठी, जिभेचे चोचले पुरवणाऱ्या खाऊ गल्ल्यासुद्धा आहेत. फळे, भाजीपालासुद्धा उपलब्ध आहे.

बोहरी आळी, बहुविध जाती-जमातीचा व्यापारीवर्ग आणि तितक्याच नानाविध प्रकारच्या वस्तूंच्या दुकानांनी नटलेली आणि रंगलेली! वर्षांचे बाराही महिने, करोडो रुपयांची उलाढाल असलेली, पुणे शहराची प्रतिष्ठा, मान, कीर्ती आणि प्रसिद्धी असलेली बाजारपेठ, शहरातील अनेक व्यापार वस्त्या, वाढत्या व्यापामुळे स्थलांतरित झाल्या तरी त्याला अपवाद एकच, बोहरी आळीचा! इथल्या काही पेढय़ा शंभर-सव्वाशे वर्षे जुन्या आहेत. मुख्यत्वे बोहरी समाजाचे वास्तव्य असले तरी त्यांच्याबरोबर, गुजराथी, मारवाडी, सिंधी, आगरवाल आणि अगदी तुरळक मराठी मंडळी, व्यापारानिमित्ताने, इथे एकत्रित कौटुंबिक जिव्हाळ्याने राहतात.

इथल्या दुकानांचा विचार केला तर अगदी भाजीपाल्यापासून, अंत्यविधीपर्यंतचे सर्व सामान याच परिसरात उपलब्ध आहे. रविवार, बुधवार आणि शुक्रवार पेठेच्या सीमेवरची ही बोहरी आळी; इथे प्लंबिंग- हार्डवेअरचा माल आहे, तसेच काचा, आरसे, फोटोफ्रेमसुद्धा आहे. पेपर डिश, द्रोण, प्लॅस्टिक प्लेट्स याचबरोबर पारंपरिक व्यापारी हिशेब वह्य़ा, रोजमेळ खतावणी, कीर्द आणि लेजर बुक्ससुद्धा आहेत. स्टेशनरी साहित्याबरोबरच कॅनव्हास आणि ताडपत्र्यांची कव्हर्स आहेत. सुतळी, नाडय़ा, दोर आणि काथ्याचे बंडल आहेत. बढाई आणि ठाकूर मंडळींची  लाकडी कारागिरी आहे. सुऱ्या, कोयते, विळी यांच्या विक्रीबरोबरच त्यांना धार लावण्याची दुकानेसुद्धा आहेत. तपकीर विकणारे एक दुकान आहे, त्याचबरोबर वर्षभर बासुंदी विकणारे आणि सणावाराला अनुसरून मिठाई बनविणारे पण आहेत. साडय़ांप्रमाणेच, बस्त्यासाठी खचाखच भरलेली दुकाने आहेत. फक्त चहा भुकटीचा व्यापार वर्षांनुवर्षे करणारी पेढी आहे. पर्स, पाऊच, हॅवरसॅक यांची काळानुरूप बदलती रूपे इथे दिसतात. रंग साहित्याबरोबरच इथे फेटे आणि जरी पट्टय़ांचीसुद्धा विक्री आहे. खाद्य पदार्थासाठी, सर्व प्रकारचे सुगंधी अर्क इथेच उपलब्ध आहेत. पतंग आणि मांजा स्वत: बनवून विकणारे याच परिसरात आहेत. व्यापाऱ्यांच्या दिमतीसाठी, प्रकाश काची यांची फळांची गाडी, मोहन आइस्क्रीम, लेले यांचा बटाटेवडा-आलेपाक चिवडा, पुरोहित स्वीट्स आणि त्या चौकातील साबुदाणा वडा, कवी यांची बासुंदी हे सर्व काही या परिसरातील जिव्हाळ्याचे विषय आहेत. गुजराथ लॉज आणि प्रभात पापडीवाले याच परिसरात आहेत. आश्चर्य वाटते ते म्हणजे एका दुकानात लेझीम आणि डंबेल्ससुद्धा मिळतात. सीझनप्रमाणे दुकानातील वस्तूंवरून, सणावारांची चाहूल लागते, बाजारपेठेचे रंगसुद्धा तत्परतेने बदलतात. पंधरा ऑगस्टच्या संध्याकाळी झेंडा विषय गोडाऊनमध्ये असतो, हा माझा अनुभव आहे.

बोहरी आळीचे वैशिष्टय़ म्हणून, प्रातिनिधिक स्वरूपात दाऊदभाई अब्दुलअली यांच्या पेढीचा उल्लेख अपरिहार्य आहे. व्यापारी हिशेबाच्या वह्य़ा म्हणजेच चोपडा विक्रीचे हे व्यावसायिक, दिवाळीचे चार दिवस विक्री आणि एरवी वर्षभर केवळ कारखानदारी! असे असले तरी त्यामध्ये श्रद्धा, भावना, संस्कार आणि परंपरा या सगळ्यांचा सुरेख संगम दिसतो. खरेदीला आलेल्या व्यापाऱ्यांच्या हाती चोपडय़ा देताना वह्य़ांचे पूजन हातीमभाई करतात आणि परस्परांना कुंकू लावले जाते. धने आणि गूळ यांचा प्रसाद दिला-घेतला जातो आणि पूजेच्या पानासह वह्य़ा, कॅलेंडर, ग्राहकांच्या उपरण्यामध्ये सुपूर्त होतात. दिवसभर साजऱ्या होत असलेल्या या सोहळ्याचे वर्णन करायला पु.लं., माडगूळकर यांच्यासारखे सिद्धहस्त लेखकच हवेत!

अठरापगड जाती-जमातीचे, विविध धर्माचे लोक, व्यापारानिमित्ताने इथे गुण्यागोविंदाने नांदतात. काळानुरूप वस्तू बदलतात, पिढय़ा बदलल्या तरी परंपरा जपण्याचा आटोकाट प्रयत्न आहे. शिक्षणाने क्षितिजे विस्तारली तरी, जिव्हाळ्याची पेढी जपण्याचा अट्टाहास आहे. गुरुवार पेठेतील जैन मंदिरापासून सोन्या मारुती चौकापर्यंतचा हा परिसर पुण्याच्या लौकिकाचा तुरा आहे. ताणतणाव इथे कधीच नाही, आहे तो फक्त बंधुभाव! जामा मशीद आहे, सोमेश्वराचे, खंडोबाचे, विष्णूचे प्राचीन मंदिरसुद्धा आहे. चित्रपटसृष्टीच्या पाऊलखुणा असलेले विजयानंद चित्रपटगृह या परिसरात आहे. देवदासींच्या कथा, व्यथा आणि जगण्याची धडपड परिसराला परिचित आहे. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे बालपणीचे निवासस्थान याच भागात आहे. ईदची मिरवणूक येथून जशी जाते, तसेच ज्ञानोबा, तुकारामांच्या पालखीचा मार्गसुद्धा येथूनच जातो. एकात्मभावाचे असे बाजारपेठेचे रूप क्वचितच पाहायला मिळते.

आनंद सराफ