बाजार मग तो कोणताही असू दे, हे ठिकाण बहुतेक सर्वाच्याच आवडीचे असते. गावातल्या एसटी स्टॅण्डजवळचा अगदी छोटा बाजार असू दे, गावातला आठवडी बाजार असू दे, जत्रेतला बाजार असू दे नाही तर शहरातला मॉलरूपी बाजार असू दे.. बाजार हे ठिकाण सर्वानाच आकर्षून घेत असते. पुण्यातल्या बाजारांना जशी मोठी परंपरा आहे तशीच दीर्घ परंपरा पुण्याच्या आसपासच्या बाजारांनाही आहे. पुण्यातले बाजार, पुण्याजवळचे बाजार किंवा जवळच्या गावांमधले बाजार, यातला कोणताही बाजार बघितला तरी त्याचे वैशिष्टय़ लगेचच लक्षात येते. या सर्व बाजारांची काही ना काही खासियत आहे. त्यांना इतिहास आहे. त्या त्या बाजाराची छाप वेगवेगळी आहे. पुण्यातल्या अशा वेगवेगळ्या बाजारांची सफर दर पंधरवडय़ाने आपण या सदरातून करू या. अनेक बाजारांमध्ये आपण अनेकदा जात असतो. मात्र त्या बाजाराचा इतिहास सर्वाना महिती असतोच असे नाही. त्या त्या बाजारांची काही वैशिष्टय़देखील असतात. पंधरवडय़ाच्या बाजारभेटीतून आपण या बाजारांचा थोडा इतिहास समजून घेऊ.

पुण्यात अलीकडच्या काळात नव्याने सुरू झालेले काही बाजारही आता चांगलेच प्रस्थापित झाले आहेत. गुलटेकडी मार्केट यार्डचा भाजीपाला आणि फळांचा घाऊक बाजार हे त्याचे ठळक उदाहरण. मध्य पुण्यातली मंडई गुलटेकडीला जाईल असे कधी कोणाला वाटले नव्हते. पण अखेर गुलटेकडी मार्केट यार्ड म्हणून तेथे घाऊक बाजार सुरू झाला आणि हळूहळू तो रुजला. काही वर्षांतच अशी परिस्थिती निर्माण झाली की गुलटेकडी मार्केट यार्ड हे पुण्यातले एक महत्त्वाचे ठिकाण झाले. बाजाराचा हा बदल अगदी पाहता पाहता घडला. पूर्वी हा बाजार घाऊक बाजार म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे तिकडे घाऊक व्यापाऱ्यांचा आणि हातगाडीवरून भाजी विकणाऱ्या तसेच भाजीच्या किरकोळ दुकानदारांचा मोठा राबता होता. तसा तो आजही आहे. पुढे पुणेकरांचेही लक्ष या बाजाराकडे वळले आणि आता फळे किंवा भाज्या आणि तऱ्हेतऱ्हेच्या फुलांच्या खरेदीसाठी कुटुंबवत्सल पुणेकर रोज या बाजारात मोठी गर्दी करतात दिसतात. विशेषत: रविवारी तर हा संपूर्ण बाजार फार मोठय़ा गर्दीने फुलून गेलेला असतो.

पुण्यातल्या किती तरी बाजारांचा फेरफटका नवनवे अनुभव देणारा असतो. दर बुधवारी आणि रविवारी भरणारा जुना बाजार किंवा तुळशीबाग किंवा मध्य पुण्यात भरणाऱ्या पारंपरिक पद्धतीच्या मंडया ही त्याची पटकन आठवणारी उदाहरणे. मध्य पुण्यात रास्ता पेठेत किंवा शुक्रवार पेठेत किंवा गणेश पेठेत भरणाऱ्या मंडईत तुम्ही सकाळी सकाळी कधी चक्कर मारलीत तर तेथे आलेला ताजा भाजीपाला पाहून कोणीही सुखावून जातो. जुन्या बाजारात फेरफटका मारताना तेथे अनेक वैविध्यपूर्ण वस्तू बघायला मिळतात. प्रत्येक बाजारात येणाऱ्या गिऱ्हाइकांचेही वैशिष्टय़ असते. पुण्याच्या परिसरात साडय़ांचे म्हणजे लग्न बस्त्यासाठीचे बाजार बहरतील असे चित्र काही पाच-सात वर्षांपूर्वी नव्हते. मात्र शहराच्या हद्दीलगत असे बाजार वाढत असल्याचे दिसत आहे. साडय़ांचा, कपडय़ांचा, फर्निचरचा, शोभिवंत लाकडी वस्तूंचा, उत्तम ग्रॅनाइटचा, मार्बलचा.. असे कितीतरी बाजार शहरालगत नव्याने वसत आहेत आणि नवा बाजार वसू लागला की पुणेकरांचीही गर्दी सुरू.. असे सगळीकडचे चित्र आहे.

तर या ‘बाजारभेटी’त पुण्यातल्या आगळ्या-वेगळ्या बाजारांची ओळख या सदरातून दर पंधरवडय़ाला करून घेऊ या..