मॅट्रिमोनी वेबसाइटच्या माध्यमातून घटस्फोटित असल्याचे भासवून फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बंगळुरू येथील तरुणाने आणखी एका घटस्फोटित तरुणीची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
येरवडय़ात राहणाऱ्या तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार विनयकुमार प्रकाशराव माने (वय ३२, रा. रामनिलय चामुंडेश्वरी लेआऊट, बंगळुरू, कर्नाटक) याच्या विरुद्ध फसवणूक, बलात्कार, चोरी व धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबरला माने याच्या बहिणीने संबंधित वेबसाइटवर एक मेल पाठविला. आपला भाऊ घटस्फोटित असून, त्याला पुनर्विवाह करायचा असल्याचा बनाव तिने त्यात केला. फिर्यादी तरुणीने या मेलला प्रतिसाद दिला व मानेशी संपर्क साधला. त्याच दिवश माने या तरुणीला नगर रस्त्यावरील एका मॉलमध्ये भेटला.
आपला व्यवसाय असल्याची बतावणी मानेने केली. त्यानंतर तो तिला घेऊन बंगळुरूला गेला व आपल्या आईशी भेट घालून दिली. व्यवसायासाठी कर्ज काढणार असल्याचे मानेने या तरुणीला सांगितले. तरुणीकडून साठ हजार रुपये घेतले व कर्जासाठी तिला जामीनही करून घेतले. १९ ऑक्टोबरला माने तरुणीच्या घरी आला व तिला जिवे मारण्याची धमकी दिली. तिच्यावर बलात्कार करून घरातील सोने-चांदीचे दागिने घेऊन तो पसार झाला. माने याने अशाच पद्धतीने पाषाणमधील घटस्फोटित तरुणीची फसवणूक केली होती. त्या तरुणीने शिवसेना व भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर माने याला शिवसैनिकांनी स्वारगेट परिसरात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.