माउली आणि तुकोबांच्या पालख्यांचे उत्साहात स्वागत

पंढरीचा महिमा।

देतां आणीक उपमा।।

ऐसा ठाव नाही कोठे।

देव उभा उभी भेटे।।

पंढरीनाथाच्या भेटीची आस घेऊन त्याच्या नामाचा अखंड घोष करीत निघालेल्या लाखो वैष्णवांच्या संगतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू तुकाराममहाराजांच्या पालख्यांचे बुधवारी पुण्यनगरीत आगमन झाले. पालख्यांच्या आगमनाने शहरात जणू भक्तिचैतन्यच संचारले. पुणेकरांनी दोन्हीही पालख्यांचे ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत केले. भक्तिकल्लोळ करीत शहरात दाखल झालेल्या वारकऱ्यांना विविध सेवा-सुविधा पुरविण्यासाठी संस्था, संघटना, मंडळे व नागरिकांनी वेगवेगळे उपक्रम राबविले. दोन्ही पालख्या गुरुवापर्यंत शहरात मुक्कामी आहेत. शुक्रवारी (१ जुलै) पालख्या शहराचा निरोप घेतील.

आळंदीतून मंगळवारी प्रस्थान झालेली माउलींची पालखी मुक्कामानंतर बुधवारी सकाळी पुण्याकडे मार्गस्थ झाली. तुकोबांची पालखी मंगळवारी आकुर्डी मुक्कामी होती. ही पालखीही सकाळीच पुणे मुक्कामासाठी मार्गस्थ झाली. शहरात पालख्यांचे आगमन  होणार असल्याने सकाळपासूनच पालख्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. वारीच्या वाटेवर असलेल्या, पण पालख्यांसोबत न चालणारे वारकरी सकाळपासूनच शहरात येत होते. त्यांना नाष्टा व भोजनाची व्यवस्थाही अनेक संस्था, संघटनांकडून करण्यात आली होती. शहराच्या प्रत्येक चौकामध्ये पालख्यांच्या स्वागताचे फलक झळकत होते.

दुपारनंतर सर्वानाच पालख्यांच्या आगमनाचे वेध लागले. पालिकेच्या वतीने पाटील इस्टेट येथे स्वागतासाठी कक्ष उभारण्यात आला होता. त्या ठिकाणी पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पुण्यनगरीमध्ये तुकोबांच्या पालखीचा प्रवेश बोपोडी येथून झाला. त्या ठिकाणीही पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. वाकडेवाडी येथे पालखीचा दुपारचा विसावा झाल्यानंतर तुकोबांची पालखी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पाटील इस्टेट येथे आली. या ठिकाणी महापौर प्रशांत जगताप त्याचप्रमाणे खासदार अनिल शिरोळे यांच्याकडून पालख्यांचे स्वागत झाले.

तुकोबांची पालखी पुढे गेल्यानंतर भाविकांना माउलींच्या पालखीचे वेध लागले. माउलींच्या पादुकांवर डोके टेकवून एका अलौकिक सुखाची अनुभूती घेण्यासाठी चौकात भाविकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास पालखीचा नगारा चौकात दाखल झाला. आता भाविकांच्या नजरा माउलींच्या रथाकडे लागल्या. पुण्यात पोहोचण्यास उशीर झाला असतानाही एकेक िदडी व त्यातील प्रत्येक वारकऱ्यांमधील उत्साह जराही कमी झाला नव्हता. आळंदी ते पुणे हा पालखी मार्गावरील मोठा टप्पा असतानाही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर कोणताही शीण जाणवत नव्हता. उलट भाविकांची दर्शनाची आस पाहून वारकऱ्यांमध्येही उत्साह संचारत होता.

पाटील इस्टेट चौकामध्ये सात वाजून चाळीस मिनिटांनी माउलींचा पालखी रथ आला. त्याबरोबरच माउली, माउली असा जयघोष सुरू झाला. मिळेल त्या मार्गाने रथापर्यंत जाऊन दर्शन घेण्याची लगबग सुरू झाली. माउलीच्या पादुकांना स्पर्श झालेल्या भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता. रथापर्यंत पोहोचता आले नसले, तरी लांबूनच हात जोडून मनोभावे दर्शन घेणारे भाविकही मोठय़ा प्रमाणावर होते. अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, संचेती चौक त्यानंतर कृषी महाविद्यालय चौकातून पालखी फग्र्युसन रस्त्याने पुढे निघाली, ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये काही क्षण पालखी थांबली. तेथेही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पालखी मार्गाच्या दुतर्फा सर्वच ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठय़ा संख्येने उभे होते. तुकोबांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात, तर माउलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात रात्री मुक्कामासाठी दाखल झाली. मुक्कामाच्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी रात्रीही रांगा लावल्या होत्या.

माउलींच्या पालखीला दीड तासांचा उशीर

माउलींचा पालखी सोहळा दिघीजवळ आला असताना दत्तनगर भागामध्ये पालखी रथाचे चाक पंक्चर झाले. त्यामुळे सुमारे दीड तास सोहळा जागेवर थांबला होता. याचा परिणाम म्हणून पालखी सोहळ्याच्या पुढच्या मार्गातही उशीर होत गेला. पाटील इस्टेट  चौकामध्ये तुकोबांची पालखी पुढे गेल्यानंतर तासाभरात माउलींची पालखी येते. मात्र, यंदा या चौकात संध्याकाळी साडेसातनंतर पालखी सोहळा पोहोचला. त्यामुळे मुक्कामी पोहोचण्यासही उशीर झाला.

पालखी मुक्कामाच्या जागा ताब्यात घेणार- जिल्हाधिकारी

वारकऱ्यांना प्राथमिक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी पुणे, सातारा व सोलापूर या तिन्ही जिल्ह्य़ातील पालखी मुक्कामांच्या जागा विकसित करण्यासाठी राज्य सरकारने धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार मुक्कामाच्या जागा भूसंपादन करून ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी विविध सेवा पुरविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

दरवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची चांगलीच दमछाक होते. त्यामुळे पालखी मुक्कामांच्या जागा ताब्यात घेऊन तेथे कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचे धोरण राज्य सरकारने आखले आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांची समिती नेमण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. अनेक ठिकाणी खासगी जागांवर पालख्यांच्या मुक्काम होतो. त्यामुळे या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविताना प्रशासनाला कसरत करावी लागते. त्यामुळे या जागा संपादन करून ताब्यात घ्याव्यात आणि विकसित कराव्यात असे धोरण राज्य सरकारने तयार केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पालख्यांना उद्योगनगरीचा भावपूर्ण निरोप

िपपरी- संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने बुधवारी सकाळीच पुण्याकडे प्रस्थान ठेवले. दुपारी बाराच्या सुमारास दापोडीत विसावा घेतल्यानंतर पालखीने पुणे शहरात प्रवेश केला. त्याचवेळी, आळंदीतून प्रस्थान ठेवलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. दोन्ही पालख्यांना उद्योगनगरीतील भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला. विविध संस्था संघटनांच्या वतीने पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी वस्तू तसेच खाद्यपदार्थाचे वाटप करण्यात येत होते. त्याचप्रमाणे, वारकऱ्यांची विविध प्रकारे सेवा करण्यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ दिसून येत होती.

आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. सकाळी खंडोबा माळ चौकातून पालखी पुणे-मुंबई महामार्गावर आली. एचए कॉलनी येथे पालखीने तासभर विसावा घेतला आणि साडेअकराच्या सुमारास पालखी सोहळा दापोडीत पोहोचला. आकुर्डी ते दापोडी दरम्यान जागोजागी पालखीच्या दर्शनासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. महिलांची संख्या लक्षणीय होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिक दर्शनासाठी थांबले होते. महिला पालखीचे औक्षण करत होत्या. पालखी रथावर फुलांचा वर्षांवही होत होता. महामार्गावर असलेल्या विविध कंपन्यांमधील कामगारांनी भक्तिभावाने स्वागत केले.  आळंदीहून निघालेल्या माउलींच्या पालखीचे सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरात आगमन झाले. दिघी मॅगझिन चौकात महापालिकेच्या वतीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. महापौर शकुंतला धराडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते. या वेळी िदडीप्रमुखांना विठ्ठल-रखुमाईचे शिल्प तसेच वृक्षारोपणासाठी बियांच्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले. िपपरी महापालिकेच्या वतीने सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. पालखी तसेच िदडय़ा जसजशा पुढे जात होत्या, तसतसे रस्त्यांवरील सफाईचे काम करण्यात येत होते.