वर्षभरात पुणे विभागात लाचखोरीचे २१४ गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे सरकारी कार्यालयांमध्ये किरकाेळ कामे घेऊन येणाऱ्यांना त्रास देत त्यांच्याकडून चिरीमिरी उकळण्याचे प्रमाण वाढले असून ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे, असे निरीक्षण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोंदविले आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टरने मागितलेली ३५० रुपयांची लाच किंवा भूमिअभिलेख विभागातील शिपायाने मागितलेली किरकोळ रकमेची लाच ही उदाहरणे लाचखोरांची मानसिकता दर्शविणारी आहेत. मात्र चालू वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या ४३ खटल्यांमध्ये ५७ जणांना शिक्षा झाली आहे. तसेच ३० लाचखोरांना सेवेतून निलंबितही करण्यात आले आहे. यात छोटय़ा रकमेची लाच स्वीकारणाऱ्यांचाही समावेश आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्हयांचा समावेश होतो. गेल्यावर्षी (२०१४ ) पुणे विभागात २१३ सापळे (ट्रॅप) रचले गेले. तर यंदाच्या वर्षी आतापर्यंत २१४ सापळे रचून लाचखोरांना गजाआड करण्यात आले. सरकारी कार्यालयांमध्ये काम घेऊन येणाऱ्यांची अडवणूक करून त्यांच्याकडे लाच मागितली जाते. शहरी भागात लाचेचा आकडा जास्त असतो. तर गा्रमीण भागात तक्रारदाराची आर्थिक परिस्थिती पाहून लाचखोर त्याच्याकडे लाच कमी-अधिक मागतात. बऱ्याचदा किरकोळ रक्कम देऊन काम मार्गी लावण्याची मानसिकता असते. त्यामुळे किरकोळ रकमेची लाचेची प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येत नाहीत. मात्र लाचेचा आकडा छोटा असो वा मोठा, शेवटी तक्रारदाराचा निर्धारदेखील महत्त्वाचा असतो. त्याच्या तक्रारीनंतरच सापळे रचून लाचखोरांना पकडले जाते, असे  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक शिरिष सरदेशपांडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलात नियुक्तीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडे तेथील शासकीय डॉक्टरने वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी ३५० रुपयांची लाच मागितली. लाचखोर डॉक्टरला रंगेहाथ पकडण्यात आले. तर कवठेमहांकाळ येथे एका सेतू केंद्रचालकाने २०० रुपयांची लाच मागितली होती. सातारा येथील भूमापन कार्यालयातील शिपायाला २०० रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. पुणे विभागात यंदा आठ ते दहा शासकीय कर्मचारी किरकोळ स्वरुपाची रक्कम स्वीकारताना पकडले गेले. अशी लाच छोटी असो वा मोठी, त्यामुळे आपण आपली नोकरी गमावू शकतो याचे भान बाळगणे गरजेचे आहे, याकडेही शिरिष सरदेशपांडे यांनी लक्ष वेधले.

महसूल विभागात सर्वाधिक खाबूगिरी..
सर्वाधिक खाबूगिरी महसूल विभागात आहे. यंदाच्या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागात ६३ सापळे रचून महसूल विभागातील ५८ कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले. तसेच पोलीस दलातील ५२ कर्मचाऱ्यांनाही लाच स्वीकारताना पकडण्यात आले. भूमिअभिलेख विभागात १४ आणि महावितरणमध्ये १२ सापळे लावण्यात आले.