सणासुदीच्या काळात भडकलेल्या डाळींच्या दराकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी अन्न व नागरी पुरवठा आणि पालकमंत्री गिरीश बापट यांना सुकामेव्याच्या खोक्यातून डाळींची दिवाळी भेट शनिवारी देण्यात आली. पुणेकरांच्या वतीने ही भेट महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी बापट यांना दिली.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि महापौर दत्तात्रय धनकवडे शनिवारी सकाळीच बापट यांच्या निवासस्थानी पोहोचले. काही कार्यक्रमानिमित्त बाहेर गेलेले बापट थोडय़ा वेळाने परतले. त्यानंतर खास तयार करण्यात आलेल्या खोक्यातून आणलेली डाळ काकडे आणि महापौर धनकवडे यांनी बापट यांना भेट म्हणून दिली. गिरिजा बापट याही यावेळी उपस्थित होत्या. डाळींचे वाढलेले दर लवकरात लवकर कमी झाले पाहिजेत तसेच स्वस्त दरातील डाळ नागरिकांना उपलब्ध झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी बापट यांच्याकडे महापौर धनकवडे आणि काकडे यांनी केली.
तूरडाळ सर्वत्र उपलब्ध व्हावी आणि ती स्वस्त दरात असावी यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असून येत्या दोन दिवसात शंभर रुपये प्रतिकिलो या दराने शहरात तूरडाळ उपलब्ध होईल, असे आश्वासन यावेळी बापट यांनी दिले.