डॉ. रघुनाथ गोडबोले यांचा सेवेचा वसा

वैद्यकीय तपासणी केल्यानंतर येथे तपासणीचे शुल्क सांगितले जात नाही. ते ऐच्छिक स्वरूपात द्यायचे असते. ‘इच्छा असेल आणि शक्य असतील तेवढे पैसे द्या. नाही दिले तरी चालेल,’ असे येथे आवर्जून सांगितले जाते. ही माहिती देतात, डॉ. रघुनाथ गोडबोले. पचनसंस्थेच्या आजारांचे प्रथितयश शस्त्रक्रियातज्ज्ञ अशी डॉ. गोडबोले यांची ओळख आहे. वैद्यकीय तपासणीचे शुल्क रुग्णाच्या इच्छेवर सोपविणारे गोडबोले गेल्या साडेआठ वर्षांपासून ही सेवा देण्याचा वसा चालवत आहेत.

High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश
ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

सदाशिव पेठेतील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक नीळकंठ बापू गोडबोले यांचे डॉ. रघुनाथ हे नातू. घरामध्ये पारंपरिक व्यवसाय असताना गुणवत्तेच्या आधारावर रघुनाथ यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. एका अप्रिय घटनेनंतर आजोबांनी आनंद त्रिंबक गोडबोले स्मृती रुग्णोपयोगी वस्तू केंद्र ही रुग्णोपयोगी वस्तू भाडय़ाने देण्याची सेवा सुरू केली. वैद्यकीय क्षेत्रातील रौप्यमहोत्सवी वर्षांत आपण समाजासाठी काही केले पाहिजे या जाणिवेतून डॉ. गोडबोले यांनी ऐच्छिक शुल्काचा हा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला कुटुंबीयांची भरभक्कम साथ मिळाली. १ जानेवारी २००९ या दिवसापासून रुग्णसेवेचे शुल्क ऐच्छिक करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. त्याचा लाभ अनेक गरजू रुग्णांना झाला. आशिष राठी यांनी त्यांच्या आईला तपासणीसाठी आणल्यानंतर त्यांना आलेला अनुभव ‘फेसबुक’ या समाज माध्यमावर गुरुवारी (२२ जून) ‘शेअर’ केला. केवळ दोन दिवसांत राठी यांच्या या ‘पोस्ट’ला ५९ हजार ‘लाइक’ मिळाले. २९ हजारजणांनी ही पोस्ट शेअर केली. तर, १५ हजार लोकांनी त्यावर टिप्पणी (कमेंट) केली आहे. माझ्या या कामाची अशा पद्धतीने नोंद घेतली गेली याचा आनंद आहे, असे गोडबोले यांनी सांगितले.

या व्रताचा प्रारंभ सांगताना गोडबोले म्हणाले, तपासणीसाठी आलेल्या काही रुग्णांनी शुल्कामध्ये सवलत देण्याची विनंती केल्यानंतर मी कमी पैसे आकारले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात २५ वर्षे झाल्यानंतर कोणताही डॉक्टर वरिष्ठ होतो आणि त्याचे शुल्क वाढते. त्यात काही चुकीचे आहे असे नाही.  मात्र, मी असे शुल्क वाढविले, तर रुग्णांना ते परवडणारे नाही. शिक्षण पूर्ण करून मुले आपल्या पायावर उभी राहिली असल्याने संसारातील जबाबदाऱ्यांतून मी मुक्त झालो होतो. मुलगी मानसी ही नेत्रतज्ज्ञ तर, मुलगा मिहिर ज्वेलरीचा व्यवसाय सांभाळतो. पत्नी विनिता माझ्याबरोबर रुग्णालय व्यवस्थापनाचे काम पाहते. शुल्क वाढविल्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि सल्ला यापासून रुग्ण तुटू नयेत असे मला वाटत होते. बाह्य़ रुग्ण विभाग (ओपीडी) पूर्णत: विनाशुल्क केली तर त्याचा गैरफायदा घेतला जाईल, असे माझ्या मित्रांनी मला सांगितले. कुटुंबीयांशी चर्चा करून ऐच्छिक शुल्क हा सुवर्णमध्य काढला गेला. त्यामुळे रुग्णसेवा केल्याचा आनंद तर होताच. पण, पैशांवरून गैरसमज आणि वादविवाद होण्याचा प्रश्नही आला नाही. हा सुवर्णमध्य यशस्वी झाला. गणिती हिशोबामध्ये दररोजच्या उत्पन्नापैकी साधारण निम्मे उत्पन्न मिळते असले, तरी रुग्णांचे समाधान हा आनंद लाभत असल्याने मी समाधानी आहे.

सोमवार ते शनिवार मी सदाशिव पेठेतील रुग्णालयामध्ये सकाळच्या वेळात शस्त्रक्रिया करतो. दहा खाटांच्या रुग्णालयातील तीन खाटा या गरजू रुग्णांसाठी राखीव असतात. केवळ रुग्णालय आणि औषधांचे पैसे आकारले जात असल्याने रुग्णाला एकूण बिलामध्ये १५ ते ३० टक्के सवलत मिळते.

पोटाच्या विकारासाठी दुर्बिणीद्वारे (लॅपरोस्कोपिक) शस्त्रक्रिया पुण्यामध्ये मी सुरू केली. आपटे रस्त्यावरील दवाखान्यामध्ये पाच ते साडेसहा या वेळात १० रुग्णांची तर, सदाशिव पेठेमध्ये रात्री साडेआठपर्यंत १५ रुग्णांची तपासणी करतो. शनिवारी सायंकाळ आणि रविवार संपूर्ण अशी दीड दिवस सुट्टी घेऊन मी गिर्यारोहण करून ताजातवाना होतो. ‘द हिमालीयन क्लब’चा मी सचिव असून आतापर्यंत हिमालयातील ३० गिर्यारोहण मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे.

या छंदातून मला ऊर्जा मिळते, असेही डॉ. रघुनाथ गोडबोले यांनी सांगितले.