गुलटेकडी भागातील मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये पन्नास झोपडय़ा जळून खाक झाल्या. आगीत गॅसच्या तीन सििलडरचा स्फोट झाल्याने आग आणखी भडकली. नागरिकांनी व अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच इतर घरातील सिलिंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणाला इजा झाली नाही, मात्र ऐन दसऱ्याच्या दिवशी आग लागून घरातील साहित्य जळाल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
मीनाताई ठाकरे वसाहतीतील झोपडय़ांमधून दुपारी धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांची धावाधाव सुरू झाली. जमेल त्या पद्धतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. दुपारी चारच्या सुमारास अग्निशामक दलाला याबाबतची माहिती मिळाली. दरम्यानच्या काळामध्ये आग आणखी भडकली. नागरिक घरातील साहित्य जागेवरच टाकून बाहेर पळाले. वसाहतीत पोहोचण्यासाठी एकच रस्ता असल्याने अग्निशामक दलाच्या गाडय़ा पोहोचण्यात अडथळा येत होता. त्याही स्थितीमध्ये अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी वसाहतीमधील गॅसच्या तीन सिलिंडरचे स्फोट झाले. त्यामुळे आग आणखी भडकली.
संभाव्य धोका लक्षात घेता अग्निशामक दलाच्या जवानांनी व नागरिकांनी इतर घरांमधील सििलडर घराबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले. आग पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन आजूबाजूच्या घरातील नागरिकांनाही बाहेर काढण्यात आले. १२ अग्निबंबांच्या साहाय्याने जवानांनी संध्याकाळी सुमारे साडेपाचच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर बराच वेळ पाण्याचे फवारे मारण्यात येत होते. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.

दसऱ्याच्या दिवशी संसार उघडय़ावर
दसऱ्याचा दिवस असल्याने मीनाताई ठाकरे वसाहतीमध्येही सकाळपासूनच सणाचे वातावरण होते. दुपारी वसाहतीत भीषण आग लागून संपूर्ण संसारच उद्ध्वस्त होईल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. मात्र, दुपारनंतर होत्याचे नव्हते झाले. आग लागल्याने संपूर्ण वसाहतीत हाहाकार निर्माण झाला. वसाहतीतील घरे अत्यंत दाटीवाटीने असल्याने एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंत आग झपाटय़ाने पसरत गेली. ऐन सणाच्या दिवशी घरासह साहित्य जळाल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर आले.
दरम्यान, महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आगीमुळे संसार उघडय़ावर आलेल्या नागरिकांसाठी पालिकेच्या संत नामदेव व संत ज्ञानेश्वर या शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे या नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूही पालिका प्रशासनाकडून देण्यात येणार असल्याचे धनकवडे यांनी स्पष्ट केले.