उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपध्दतीला कंटाळून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेल्या आझम पानसरे यांची अजितदादांचे पक्षांतर्गत विरोधक खासदार उदयनराजे भोसले यांनी ईदच्या निमित्ताने सदिच्छा भेट घेतली. जवळपास तासभराच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पानसरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रभावक्षेत्र असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसला पहिल्या क्रमांकावर आणू, अशी घोषणा त्यांनी पक्षात येताच केली होती. पानसरे यांना ताकद देण्यासाठी विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त जागेवर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत पानसरेंनी आघाडीच्या उमेदवाराऐवजी शिवसेनेचे काम केल्याने आमदारकीची संधी त्यांच्या हातातून गेल्याचे बोलले जाते. गेल्या काही दिवसांपासून पानसरे काँग्रेस नेतृत्वावरही खप्पामर्जी आहेत. या पाश्र्वभूमीवर, मंगळवारी ईदच्या निमित्ताने उदयनराजे पानसरेंच्या प्राधिकरणातील निवासस्थानी आले. पानसरे व उदयनराजे यांच्यात जुना स्नेह आहे. पानसरे लोकसभेचे उमेदवार होते, तेव्हाही उदयनराजे त्यांच्या प्रचारसभांसाठी शहरात आले होते. आता अनपेक्षितपणे ते पानसरेंच्या निवासस्थानी आले. शिरखुम्र्याचा आस्वाद घेत दोहोंत वेगवेगळ्या विषयांवर बरीच चर्चा झाली. या भेटीवरून राजकीय वर्तुळातील चर्चेला उधाण आले.