दरवर्षी मेळघाट येथे पावसाळ्यात कुपोषण आणि रोगराईमुळे बालमृत्यूत वाढ होते. मेळघाटात आरोग्य सेवा देण्याच्या उद्येशाने मैत्री फाउंडेशनतर्फे ‘मेळघाट मित्र’ ही धडक मोहीम आयोजित करण्यात येत आहे. मेळघाटातील बालमृत्यू वाचविण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. या उपक्रमात वेगवेगळे १० गट प्रत्यक्ष मेळघाटात जाऊन गावकऱ्यांना आरोग्य सेवा देणार आहेत. या मोहिमेला सुरूवात झाली असून, पुढील गट २६ सप्टेंबपर्यंत तेथे काम करणार आहेत.
मैत्री फाउंडेशनतर्फे यावर्षी मेळघाटातील ‘चुनखडी’ आणि ‘हिल्डा’ असे दोन अतिदुर्गम भाग सेवेसाठी निवडण्यात आले आहेत.  या भागातील ११ गावांमध्ये धडक मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. १७ जुलै ते २६ सप्टेंबर या कालावधीत १० गटांतील २०० स्वयंसेवक स्वखर्चाने या दुर्गम गावांमध्ये प्रत्यक्ष मुक्काम करणार आहेत. या मोहिमेत १८ वर्षांवरील कोणीही सहभागी होऊ शकते. मोहिमेतील पुढील गट २४ जुलै रोजी मेळघाटासाठी निघणार आहे.
‘मेळघाट मित्र’ या धडक मोहिमेत सहा वर्षांखालील मुलांच्या आजारांवर होणाऱ्या उपचारांकडे लक्ष देणे, एक वर्षांखालील सर्व मुलांच्या घरी दररोज भेट देणे, गरोदर स्त्रियांना दररोज भेटून आरोग्य शिक्षण देणे, गावातील लोकांना सोबत घेऊन सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविणे असे अनेक उपक्रम करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त साध्या आजारांवर उपचार साधणे, शासकीय आरोग्य विभाग आणि आदिवासी यांच्यामध्ये दुवा साधणे, महाराष्ट्र आदिवासी भागातील मुख्य प्रश्न समजून घेणे ही कार्ये देखील या मोहिमेत महत्त्वाची आहेत. मोहिमेसाठी प्रत्येक स्वयंसेवकाला आधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्यांना प्रत्यक्ष सहभागी होणे शक्य नाही त्यांनी आर्थिक मदत करुन मोहिमेला हातभार लावावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. मोहिमेत सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी ८६०५९१४०८६ किंवा ७५८८२४४२३१ या क्रमांकावर संपर्क साधावा.