आपल्याला सगळ्यातलं सगळं समजतं असंच प्रत्येकाला वाटत असतं. बाराखडी आली म्हणजे मला शंकराचार्य आणि ग्रेस समजले का? ग्रेसची कविता समजत नाही म्हणून त्याच्यावर दुबरेधतेचा शिक्का मारणं सोपं आहे. पण, समजत नाही म्हणजे आम्ही सामान्य असे म्हणून या सामान्यतेचा गर्व करणे कितपत योग्य आहे? ग्रेसची कविता समजण्यासाठी आपली संवेदना त्याच्याइतकी प्रखर आणि तीव्र झाली आहे का? संगीत, चित्र, शिल्प या कलांप्रमाणे वाचकाला रियाज करायला लागत नाही का, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार महेश एलकुंचवार यांनी मंगळवारी उपस्थित केला.
स्वरभारती, मा. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान आणि शिरीष थिएटर्स यांच्यातर्फे कविवर्य ग्रेस यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘मैत्र जीवांचे’ कार्यक्रमात महेश एलकुंचवार यांनी ग्रेस यांच्या मैत्रीचे बंध उलगडले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. हृदयनाथ मंगेशकर, राधा मंगेशकर आणि डॉ. सलील कुलकर्णी यांनी ग्रेस आणि अन्य कवींच्या रचना सादर केल्या.
महेश एलकुंचवार म्हणाले, ‘‘दंतकथांतून, ग्रेसने निर्माण केलेली शब्दकळा आणि त्याच्या कवितांतून ग्रेस समजला असा ‘क्लेम’ कुणी करू नये. सध्या आपल्याकडे प्रतिभावंतांचा सुळसुळाट झाला आहे. पण, प्रतिभावंत आणि गुणाढय़ यांत फरक आहे. गुणाढय़ बरेच आहेत, पण प्रतिभावंत शोधावे लागतात. ग्रेस हा अशाच प्रतिभावंतांपैकी एक होता. अर्थबोधन करणाऱ्या खूप कविता असतात. पण, ग्रेसच्या कवितांचा अर्थ असाच असे कशावरून सांगता? तिचा अनुभव महत्त्वाचा. तो ज्याचा त्याने मिळवावा. ही अद्भुत शक्ती ग्रेसकडे होती. भुरळ पडावी आणि चेटूक करावी अशीच ग्रेसची प्रतिभा होती. त्याच्या कवितेने मला हलविले. अंतरीच्या गूढगर्भी जाऊन पोहोचविले. त्याच्या कवितेचा अर्थबोध होत नाही. पण, ही कविता बुद्धीने अर्थ लावण्याची नाही तर, भोगण्याची आहे. आमच्यातील संबंध संपले असले तरी बंध कायम होते. ‘आमचे संबंध वाईट नाहीत. पण, बिकट आहेत’, असे ग्रेसनेच लिहून ठेवले आहे. तो बैरागीच होता. त्याच्यामध्ये विलक्षण पीळ, रग, मुजोरी होती. पण, त्यातही कोवळेपण होते. आपत्ती-विपत्ती पलीकडच्या दु:खाबद्दल त्याची कविता बोलते. ग्रेस आणि जीए हे आपल्या आवाक्याबाहेरचे आहेत. आपण काय गमावले हे माणसाला त्याने गमावल्यावरच समजते. तसेच ग्रेसचे आपल्यामध्ये नसण्याबाबत झाले आहे.’’