पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विज्ञान केंद्रामध्ये कारगिल युद्धामध्ये वापर करण्यात आलेल्या मिग २३ जातीचे विमान आणण्यात आले आहे. भारतीय वायुसेनेने आठ कोटी रुपये किमतीचे परंतु सध्या वापरात नसलेले हे विमान विज्ञान केंद्रासाठी विनामूल्य दिले आहे. शहरातील विद्यार्थ्यांना लवकरच हे विमान पाहता येणार आहे.

बंगळुरु येथील विज्ञान केंद्राच्या धर्तीवर चिंचवड येथे साडेसात एकर जागेवर विज्ञान केंद्र साकारण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, हा विज्ञान केंद्राच्या स्थापनेचा उद्देश आहे. विज्ञान केंद्राच्या शेजारीच तारांगण उभारणीचे काम सुरू आहे. विज्ञान केंद्रामध्ये २६८ प्रकारची वैज्ञानिक उपकरणे विद्यार्थ्यांना तसेच पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात आता मिग २३ या विमानाची भर पडली आहे. हे विमान भारतीय वायुसेनेने विज्ञान केंद्राला विनामूल्य दिले आहे. विमानाची किंमत आठ कोटी इतकी आहे. विमानाचे तीन भाग करून ते विज्ञान केंद्रात आणण्यात आले आहे. तारांगण आणि सायन्स पार्कच्या मध्यभागी हे विमान ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.