भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिकेची गाडी बोलाविल्यानंतर झालेल्या वादातून श्वानप्रेमी तरुणी आणि तिच्या आईला शिवीगाळ करून बेदम मारहाण करणाऱ्या मिलिंद काळे यांना मंगळवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. आई व तरुणीला मारहाण केल्याची घटना कोथरूडमधील महात्मा सोसायटीत रविवारी (२५ सप्टेंबर) घडली होती. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी सोमवारी काळेंना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने मंगळवापर्यंत (२७ सप्टेंबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने काळेंना मंगळवारी दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
या संदर्भात एका वीस वर्षीय तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी महात्मा सोसायटी भागात एका भटक्या कुत्रीने चार पिलांना जन्म दिला होता. दरम्यान, कुत्रीचा मृत्यू झाला. त्यानंतर चार पिलांचे संगोपन तक्रारदार तरुणी आणि तिच्या आईने केले. सोसायटीच्या आवारात भटकी कुत्री असल्याने तक्रारदार तरुणी आणि तिच्या आईसोबत काही दिवसांपूर्वी काळेंचा वाद झाला होता. या कारणावरून काळेंनी तरुणीला त्रास दिला होता, असे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. काळेंनी महापालिकेच्या गाडीला रविवारी दुपारी सोसायटीत बोलाविले. भटकी कुत्री पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दोन पिले पकडली.
पिले लहान असल्याने त्यांना पकडू नये, असे तरुणीने सांगितले. या कारणावरून पुन्हा काळे आणि तरुणीमध्ये वाद झाला. काळेंनी तरुणी आणि तिच्या आईला धक्काबुक्की केली. काळेंनी केलेल्या धक्काबुक्कीत तरुणीचा दात तुटला. त्यानंतर काळे तेथून पसार झाले. तरुणी आणि तिच्या आईवर रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.