भारतीय लष्कराच्या इतिहासामध्ये प्रथमच होणाऱ्या १८ देशांचा सहभाग असलेल्या संयुक्त लष्करी सरावासाठी सर्व देशांचे प्रशिक्षक अधिकारी पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. २ ते ८ मार्च या कालावधीत औंध लष्करी तळ आणि लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) येथे हा सराव होणार असून, यामध्ये अमेरिका, चीन, जपानसह आशियाई देशांचा समावेश आहे.
या संयुक्त सरावाला ‘एक्सरसाइज फोर्स १८’ असे नाव देण्यात आले आहे. भूसुरुंगाचा शोध घेऊन ते नष्ट करणे आणि शांतता मोहिमेदरम्यान कारवायांचा सराव करणे हा या संयुक्त सरावाचा उद्देश आहे. या सरावादरम्यान भाषेचा अडथळा होऊ नये आणि सरावामध्ये एकरूपता असावी यासाठी १ मार्चपर्यंत या अधिकाऱ्यांना भारतीय लष्करातील अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
परस्परांच्या लष्करातील सर्वोत्तम कार्यपद्धतीची माहिती घेऊन त्याचा सराव करणे आणि जागतिक शांतता व स्थैर्यासाठी आपली बांधिलकी दर्शविणे हा या संयुक्त सरावाचा मुख्य उद्देश आहे. या सरावामध्ये संघभावना निर्माण व्हावी हे उद्दिष्ट डोळय़ांसमोर ठेवून सरावामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व देशांच्या लष्करी प्रशिक्षक अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष सरावाच्या एक आठवडा आधीच प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी २५ प्रशिक्षक अधिकारी पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. शिवनेरी इन्फ्रंट्री ब्रिगेडचे प्रमुख आलोक चंद्रा यांनी या प्रशिक्षक अधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि या अधिकाऱ्यांना संयुक्त सरावाच्या तयारीची माहिती देण्यात आली. भूसुरुंग तसेच शांतता मोहिमेचा अनुभव असलेल्या या अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण साहित्याचे भाषांतर करणे, प्रत्यक्ष सरावाची कार्यपद्धती समजून घेणे या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे सरावादरम्यान भाषेचा अडसर दूर होऊन सर्वसामान्य पद्धतीने हा सराव पार पडू शकेल.