महापालिकेतील एक स्वीकृत सदस्य मिळावे यासाठी काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून एमआयएम या पक्षाच्या सदस्याला खेचण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मात्र एमआयएमशी सूत जुळविण्याच्या प्रकाराला पक्षातीलच काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. एका पदासाठी लाचार होऊन एमआयएमसारख्या पक्षाशी हातमिळवणी करणे योग्य आहे का, असा प्रश्नही कॉंग्रेस पक्षात उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी दहा जागा मिळाल्या. त्यामुळे स्वीकृत सदस्य कोणत्या पक्षाचा होणार याचा निर्णय चिठ्ठी टाकून करण्यात येणार आहे. महापालिकेच्या कायद्यातील तरतुदीनुसार सध्या पाच सदस्यांना स्वीकृत म्हणून सभागृहात घेता येणार असून पक्षाच्या संख्याबळानुसार भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक तीन, राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळणार आहे. तर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार हे चिठ्ठीद्वारे ठरणार आहे. त्यामुळे सभागृहातील पाचव्या स्वीकृत सदस्याचा निकाल हा चिठ्ठीवरच राहणार आहे. त्यामुळे हे पद काँग्रेसला मिळावे यासाठी एमआयएम बरोबर हातमिळवणी करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या काही नेत्यांकडून सुरु झाला आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या कालावधीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पक्षातील अन्य वरिष्ठ नेत्यांनी एमआयएम सारख्या पक्षाला साथ देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरही एका जागेसाठी काँग्रेसकडून या हालचाली सुरु झाल्यामुळे पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, नगरसेवकांकडून त्याला विरोध सुरु झाला आहे. यासंदर्भात माजी उपमहापौर आणि नगरसेवक आबा बागुल यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना निवेदनही दिले आहे.

‘एमआयएम सारख्या पक्षाशी घरोबा करण्याच्या हालचाली पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून सुरु आहेत. निवडणुकीच्या कालावधीत एमआयएमच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर आगपाखड केली होती. मग पदांसाठी अशा पक्षाच्या दारात जाणे कितपत योग्य आहे? निवडणुकीवेळी ज्या पक्षाच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांने लढत दिली त्याच्या भावनांही या निर्णयामुळे दुखावण्याची शक्यता आहे. असे निर्णय घेतले जात असतील तर शहराचे नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचे हे आता ठरवावे लागेल. पक्षाच्या पुण्यातील अस्तित्वासाठीही कार्यकर्ते शिल्लक राहणार नाहीत,’ असे बागुल यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे.