कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहिल्याने विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. ‘ज्या पक्षाने दाऊद इब्राहिम आणि शरद पवार यांचे संबध असल्याचे आरोप करत रान पेटवले, त्यांचे मंत्री गिरीश महाजन हे दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला जातात. ही गंभीर चूक असून महाजन यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

‘ज्यावेळी कोणताही मंत्री एखाद्या लग्नास किंवा कार्यक्रमाला जातो, त्यावेळी पोलीस आयुक्त कोणाचा कार्यक्रम आणि त्याठिकाणी कोणाची उपस्थिती आहे, याबद्दलची माहिती देतात. गिरीश महाजन यांना लग्न कोणाचे होते याबद्दलची माहिती दिली नव्हती का ?, असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार बोलत होते.

वाचा- दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला गिरीश महाजनांची उपस्थिती; मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाचा लग्न समारंभ नाशिकमध्ये १९ मे रोजी पार पडला. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहिल्याने वाद निर्माण झाला आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पोलिसांना या संदर्भात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे या जंगी विवाह सोहळ्यास लोकप्रतिनिधींसह बुकी आणि अन्य मान्यवर मंडळींसह पोलिसांनी हजेरी लावली. त्यामुळे या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचे गृह खाते नेमकी कोणावर कोणती कारवाई केली जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.