धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी; गरजू, विनोदी कलाकारांना सहाय्य

प्रसिद्ध साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या फाउंडेशनकडून गरजू तसेच विनोदी कलाकारांना मदत केली जाणार आहे. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात द. मा. मिरासदार फाउंडेशनची नोंदणी नुकतीच करण्यात आली. न्यासाच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत न्यासाचे अध्यक्ष आणि अभिनेता रवींद्र मंकणी यांना पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.

अभिनेते रवींद्र मंकणी यांनी द. मा. मिरासदार यांच्या नावे ही विश्वस्त संस्था स्थापन केली आहे. मराठीतील ख्यातनाम लेखक, कथाकथनकार अशी मिरासदार यांची ओळख असून असून व्यकुंची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी ही पुस्तके गाजली आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटाचे लेखनही मिरासदार यांनी केले आहे.

मिरासदार ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम राबविले जाणार असून त्यामध्ये गरजू तसेच विनोदी कलाकारांना मदत केली जाणार आहे. सांस्कृतिक चळवळ समृद्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. मिरासदार यांच्या साहित्याचा प्रचार व प्रसारही केला जाणार असून विविध विनोदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गरजू तसेच विनोदी कलाकारांच्या शिक्षणाची आणि राहण्याची सोय करण्याचे नियोजन करण्यात येणार असून प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकारांना आर्थिक मदत करणे, पडद्यामागील कलाकारांना मदत करणे, हा या न्यासाच्या स्थापनेचा उद्देश असल्याचे मंकणी यांनी सांगितले.

शासकीय सेवा ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार धर्मादाय आयुक्तालयाच्या वतीने द. मा. मिरासदार फाउंडेशनला नोंदणीच्या दिवशीच संस्था नोंदणीची ऑनलाइन प्रत प्रदान करण्यात आली, अशी माहिती धर्मादाय आयुक्तालयाकडून देण्यात आली. सहायक धर्मादाय आयुक्त साजिद रचभरे, नवनाथ जगताप, कांचन जाधव, अधीक्षक के. डी. शिंदे, न्यासाचे वकील मुकेश परदेशी या वेळी उपस्थित होते.