कामगार संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’चा बुधवारी पुण्यात संमिश्र परिणाम दिसून आला. बँका, विमा कंपन्या, पोस्ट, बीएसएनएलची कार्यालये, विविध कंपन्या बंद होत्या. अनेक ठिकाणी एटीएमही बंद झाली होती.
कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचा पुण्यात विविध क्षेत्रांवर परिणाम दिसला. पुण्यातील सर्व बँका, विमा कंपन्या बंद होत्या. शिवजयंतीची सुट्टी आणि लगेच सुरू झालेल्या संपाचा परिणाम एटीएमवर दिसून आला. अनेक ठिकाणी एटीएममधील पैसे संपल्यामुळे एटीएम बंद होते. औद्योगिक परिसरातील अनेक कारखानेही बंद होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचाही या संपामध्ये सहभाग होता. परिचारिकांच्या संघटनेचाही संपामध्ये सहभाग असल्यामुळे काही रुग्णालयांमध्ये त्याचा परिणाम दिसून आला. काही रुग्णालयांनी संपाच्या पाश्र्वभूमीवर आधीच पर्यायी व्यवस्थेमुळे व्यवस्था केली होती. ससून रुग्णालयात आज केवळ तेवीस परिचारिका आणि १५० कर्मचारी कामावर हजर होते. संपात सहभागी झालेल्या परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची जागा शिकाऊ डॉक्टर आणि परिचारकांनी घेतली. रुग्णालयातील नव्वद टक्के परिचारिका आणि पंचवीस टक्के कामगार वर्ग संपात सहभागी झाल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक कुलकर्णी यांनी दिली आहे. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी शिकाऊ डॉक्टर व परिचारकांनी काम केल्याचे त्यांनी सांगितले. या संपाचा शस्त्रक्रियांवर काही प्रमाणात परिणाम झाला, परंतु ज्या शस्त्रक्रिया पुढे ढकलणे शक्य होते त्या पुढे ढकलून आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शहरातील इतर सरकारी रुग्णालयांतही संपासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.
शहरातील शाळा, महाविद्यालये सुरू होती. शाळेच्या बस आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा सुरू असल्याने मुलांना शाळेत पाठवले असल्याचे पालकांनी सांगितले. दिवसभर शहरातील विविध ठिकाणी कामगार संघटनांनी सभा घेतल्या. पिंपरी चौक, सणसवाडी, शिक्रापूर अशा काही ठिकाणी संघटनांकडून रास्ता रोको करण्यात आले. महापालिकेची तसेच पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामावर येण्याचा निर्णय घेतल्यामुळे महापालिकेची तसेच पीएमपीची सेवा दिवसभरात कोठेही विस्कळीत झाली नाही. देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी महापालिकेसमोर महापालिका कामगार युनियनतर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी निदर्शनेही करण्यात आली. महापालिकेचे सर्व कर्मचारी बुधवारी कामावर होते. अनेक कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. कर्मचारी कामावर असल्यामुळे अत्यावश्यक सेवेसह महापालिकेच्या सर्व सेवा दिवसभर सुरळीत होत्या, असे कामगार कल्याण अधिकारी शिवाजी दौंडकर यांनी सांगितले. पीएमपीच्याही कर्मचाऱ्यांनी संपाला पाठिंबा दिला होता. मात्र, सर्व कामगार कामावर होते. त्यामुळे सर्व गाडय़ा नेहमीप्रमाणेच मार्गावर होत्या. संपाच्या दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. त्यामुळे पीएमपीचे कोणतेही नुकसान झाल्याची नोंद नसल्याचे जनसंपर्क अधिकारी दीपकसिंग परदेशी यांनी सांगितले. दिवसभर प्रवासीसंख्याही नेहमीएवढीच होती. कोणत्याही भागात विशेष गर्दी नव्हती. त्यामुळे नेहमीच्याच नियोजनाप्रमाणे गाडय़ा सोडल्या जात होत्या, असेही ते म्हणाले.
                                       
रिक्षा आज सुरू
कामगार संघटनांचा गुरुवारीही बंद आहे. मात्र, गुरुवारपासून बारावीची परीक्षा सुरू होत असल्यामुळे या बंदमध्ये रिक्षा संघटना सहभागी होणार नाहीत. तसेच, पीएमपी सुरू राहणार आहे. त्यामुळे बंदचा परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता नाही.