पुणे आणि पिंपरीत सुरू होत असलेल्या नव्या स्वरूपातील बीआरटीला रेनबो हे नाव देण्यात आले असून या नावाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. पुण्याच्या बीआरटीला मराठीच नाव असावे या दृष्टीने या बीआरटीला इंद्रधनुष्य हे नाव द्यावे अशी मागणी मनसेने केली आहे.
पुणे आणि पिंपरीत बीआरटीचे दोन नवे मार्ग सुरू होत असून या मार्गावर सध्या चाचणी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. या नव्या मार्गावरील बीआरटीच्या प्रचारासाठी प्रकल्पाला रेनबो असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नावाला विरोध असल्याचे पत्र मनसेचे गटनेता राजेंद्र वागसकर यांनी मंगळवारी प्रशासनाला दिले. राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या सेवेला ज्या प्रमाणे शिवनेरी हे नाव देण्यात आले आहे, कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या सेवेला ऐरावत हे नाव देण्यात आले आहे, तशाच पद्धतीने पुण्याच्या बीआरटीला इंद्रधनुष्य हे नाव देण्यात यावे असे वागसकर यांनी या पत्रात नमूद केले आहे. बीआरटीसाठी रेनबो हे नाव वापरले गेल्यास आंदोलन केले जाईल असाही इशारा मनसेने दिला आहे. या मागणीनंतर बीआरटीच्या रेनबो या नावात बदल न केल्यास इंद्रधनुष्य या नावाच्या पाटय़ा मनसेतर्फे स्वखर्चाने बीआरटी मार्गावर तसेच गाडय़ांवर लावल्या जातील, असेही प्रशासनाला कळवण्यात आले आहे.
बीआरटी मार्गाचे उद्घाटन रविवारी
संगमवाडी येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या सात किलोमीटर लांबीच्या बीआरटी मार्गाचे उद्घाटन रविवारी (३० ऑगस्ट) होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन केले जाणार असल्याचे मंगळवारी सांगण्यात आले. या मार्गावरील सर्व कामे पूर्ण झाली असून अद्ययावत सुविधा असलेली बीआरटी असे तिचे स्वरूप असेल.