पिंपरी पालिकेतील मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे यांच्या पक्षातून बाहेर पडण्याच्या हालचाली लक्षात आल्यानंतर, ‘राजीनामा द्या, अन्यथा हकालपट्टी करू’ अशी तंबी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यांना दिली. सुरुवातीला भाजपमध्ये जाण्यास उत्सुक असलेल्या कोऱ्हाळे यांनी अखेर, शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोऱ्हाळे यांनी सोमवारी भेट घेतली. तथापि, तांत्रिक कारणास्तव पत्नी गायत्री कोऱ्हाळे यांचा प्रवेश करण्यात आला. कोऱ्हाळे यांच्यासह सरिता साने, अ‍ॅड. सचिन भोसले, बाळासाहेब वाल्हेकर, हनुमंत लांडगे यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहुल कलाटे, गटनेत्या सुलभा उबाळे आदी यावेळी उपस्थित होते. पिंपरी पालिकेत मनसेचे चार नगरसेवक आहेत. त्यापैकी नगरसेवक राहुल जाधव आणि मंगेश खांडेकर यांनी यापूर्वीच ‘बाहेरचा रस्ता’ धरला आहे. त्यानंतर, गटनेतेपदी असलेल्या कोऱ्हाळे यांनीही शिवसेनेची वाट धरली आहे. चिंचवड गावातून पुन्हा मनसेच्या तिकिटावर निवडून येता येणार नाही, याची खात्री झाल्याने कोऱ्हाळे भाजपकडून लढण्यास उत्सुक होते. मात्र, त्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळू शकला नाही. अखेर, स्थानिक गणिते लक्षात घेऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. चिंचवड गावातील खुल्या जागेवर उमेदवारी मिळावी, अशी कोऱ्हाळे यांनी सेनेकडे मागणी केली आहे.