केंद्रीय बँका आणि खासगी बँकाच्या व्यवहारात मराठी भाषा नाकारण्यात येत असून बँकांमध्ये हिंदूी भाषेचा वापर सुरू झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी बँकांसमोर आंदोलन करण्यात आले.

बँकांच्या दैनंदिन व्यवहाराचे प्रादेशिक भाषा हे माध्यम असावे असा केंद्र सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचा (आरबीआय) नियम आहे. मात्र त्यानंतरही शहरातील केंद्रीय बँका आणि खासगी बँकांकडून मराठी भाषा नाकारून हिंदी भाषेचा वापर सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर शहरातील सर्वच बँका, मोबाइल कंपन्या आणि बीएसएनएला मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी पत्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतरही मराठी भाषेचा वापर होत नसल्याचे दिसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. बँक ऑफ बडोदाच्या शहरातील बहुसंख्य एटीएममध्ये इंग्रजी, हिंदी आणि गुजराथी भाषा माध्यम म्हणून वापरली जात आहे. त्या संदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. बँका आणि मोबाइल कंपन्यांनी दैनंदिन व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर करण्यास सुरुवात न केल्यास मनसे आक्रमक पद्धतीने आंदोलन करेल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. या आंदोलनात मनसेचे प्रल्हाद गवळी, सुधीर धावडे, प्रशांत मते, नरेंद्र तांबोळी, जयश्री मोरे, कैलास दांगट, राम बोरकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.