मेट्रो सिटीच्या माध्यमातून विकासाच्या दिशेने आगेकूच करत असलेल्या पुणे शहरातील नदीपात्राचा विकास आराखडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी सादर केला. नाशिकमधील नदी पात्रालगत केलेल्या कामाचा दाखला देत त्यांनी मुळा-मुठा नदीपात्राचा विकास शक्य असल्याचे म्हटले आहे. नदीपात्रालगतच्या विकासाचा आराखडा मुख्यमंत्र्यांना देखील दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराच्या विकास कामात सरकारकडे पैसे नसतील तर उद्योजकांच्या सहकार्याने शहराचा विकास करणे शक्य आहे. पण यासाठी उद्योजकांना कामासंदर्भात विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांनी सादर केलेल्या विकास आराखड्यामध्ये बालगंधर्व ते म्हात्रे पूल नदीपात्राच्या विकास प्रकल्पासाठी ८४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील ३४० कोटी सीएसआरच्या माध्यमातून उभे करण्यात येतील. या प्रकल्पाच्या देखभालीसाठी महिन्याला सव्वा कोटी खर्च येणार असून, या प्रकल्पामुळे ३ कोटींचा महसूल दरवर्षी मिळेल, असा विश्वास राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.

प्रस्तावित प्रकल्पामध्ये बालगंधर्व रंगमंदिराच्या विस्ताराचा विचार करण्यात आला आहे. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांप्रमाणे एक हजार प्रेक्षक क्षमतेची ५ नाटयगृहे उभी करण्याचा समावेश आराखड्यात करण्यात आला आहे. यासोबत नदीपात्रालगत बच्चे कंपनीसाठी फुलराणी, विसर्जन घाट, फूड मॉल आणि शौचालय या सुविधांचा समावेश असणार आहे.या सादरीकरणावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्ष मुरूलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि मनसेचे गटनेते वसंत मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.