पिंपरी चिंचवडमधली पाणी कपात रद्द करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पाणी आंदोलन करत महापालिकेत घोषणाबाजी केली. आज पिंपरीत पावसाने हजेरी लावली त्यामुळे फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी मनसेने आंदोलन केले का? असा प्रश्न पिंपरीकर विचारत आहेत. २ मे रोजी महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. त्यानंतर पिंपरीत एक दिवसाआड पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पवना धरणात त्यावेळई ३८ टक्के पाणीसाठा होता. मात्र ही पाणी कपात अन्यायकारक असून ती मागे घेण्यात यावी या मागणीसाठी मनसेने आज जोरदार घोषणाबाजी केली.

आजच्या घडीला पवना धरणात २३ टक्के साठा आहे, जो दोन महिने पुरेल अशी स्थिती आहे. अशात पाणी कपात पिंपरीकरांवर लादली जाते आहे असा आरोप मनसेने केला आहे. तसेच पाणी कपात लवकारत लवकर मागे न घेतल्यास मनसे तीव्र आंदोलन करणार आहे असाही इशारा देण्यात आला आहे. मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आयुक्तांनी मनसेच्या आंदोलनानंतर पाणी कपात मागे घेऊ असे आश्वासन दिले आहे. मात्र एवढे दिवस पाणी कपात सुरू असताना मनसेने आज आंदोलनाचे ढोंग का केले? असा प्रश्न पिंपरीकर विचारत आहेत. तसेच या आंदोलनादरम्यान पाऊस पडल्याने मनसेचे आंदोलन फसल्याचीही चर्चा रंगली आहे.