पिंपरी पालिकेच्या धडक मोहिमेत तीन दिवसांत तीन कोटींची वसुली

पिंपरी पालिकेने मिळकतकर थकबाकी वसुली करण्यासाठी विशेष धडक मोहीम सुरू केली असून त्याद्वारे तीन दिवसांत तीन कोटी रुपये जमा झाले आहेत. शुक्रवारी (२४ मार्च) दोन मोबाइल कंपन्या तसेच औंध उरो रुग्णालयावरही पालिकेने कारवाईचा बडगा उगारला. मोबाइल कंपन्यांनी थकबाकी न भरल्याने त्यांचे टॉवर सील करण्यात आले. तर, रुग्णालय प्रशासनाने १३ लाख रुपये भरून उर्वरित रक्कम ३१ मार्चपूर्वी भरण्याची हमी देण्यात आल्यानंतर जप्तीची कारवाई तूर्त थांबवण्यात आली.

सहआयुक्त व मिळकतकर विभागाचे प्रमुख दिलीप गावडे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. पालिकेने मिळकतकर थकबाकीच्या वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केल्यानंतर िपपळे गुरव येथील मोर ‘मॉल’कडील ९९ लाख रुपये तसेच ताथवडय़ाच्या गोदामातील ४० लाख ६५ हजार रुपये धनादेशाद्वारे भरण्यात आले. रहाटणी येथील गायकवाड कोचिंग क्लासकडे तीन वर्षांपासून २६ लाख रुपयांची थकबाकी होती. ती भरण्यास संबंधितांनी असमर्थता व्यक्त केल्यानंतर पालिकेने त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली. याशिवाय, अन्य थकबाकीदारांकडून वसुलीचे सत्र दोन दिवसांपासून सुरूच आहे. शुक्रवारी ‘टाटा टेली सर्विसेस’ आणि ‘जीटीएल’ या मोबाइल कंपन्यांकडे असलेली मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेचे पथक गेले. त्यांनी रक्कम न भरल्याने दोन्हींचे टॉवर जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. औंध उरो रुग्णालयाकडे एक कोटी ४७ लाख रुपयांची थकबाकी होती. वारंवार पाठपुरावा करूनही रुग्णालय प्रशासन त्या रकमेचा भरणा करत नव्हते. त्यामुळे शुक्रवारी थेट जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली. त्यानंतर, रुग्णालय व्यवस्थापनाने वरिष्ठांशी संपर्क साधला. १३ लाख रुपयांचा धनादेश तातडीने जमा करण्यात आला.

उर्वरित रक्कम ३१ मार्चपूर्वी

रुग्णालय व्यवस्थापनाने वरिष्ठांशी संपर्क साधला. १३ लाख रुपयांचा धनादेश तातडीने जमा करण्यात आला. उर्वरित रक्कम ३१ मार्चपूर्वी भरण्याची हमी देण्यात आल्यानंतर आजची जप्तीची कारवाई तूर्त स्थगित करण्यात आली.