आपल्याला आवडणाऱ्या कलाकाराचा आविष्कार, त्याचे छायाचित्र, त्याच्याविषयीची माहिती, यूटय़ूब लिंक्स आणि कार्यक्रमांविषयीचा तपशील याची र्सवकष माहिती देत कलाकार आणि रसिकांना जोडणारे ‘आर्टक्लिक’ या अभिनव अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती झाली आहे. ‘निनाद क्रिएशन्स’ संस्थेने निर्मिती केलेले हे अ‍ॅप्लिकेशन अँड्रॉइड फोनवर ‘प्ले स्टोअर’मार्फत मोफत उपलब्ध असून आतापर्यंत शंभर कलाकारांनी या अ‍ॅप्लिकेशनवर सदस्य म्हणून नोंदणी केली आहे.
संगीत व्यावसायिक प्रशांत कुलकर्णी आणि भरतनाटय़म कलाकार सुवर्णा कुलकर्णी यांनी निनाद क्रिएशन्स संस्थेची स्थापना केली आहे. त्यांनी निर्मिलेल्या आर्टक्लिकमार्फत संगीत, नृत्य, नाटय़, साहित्य आणि संबंधित क्षेत्रातील कलाकारांची, कार्यक्रम व्यवस्थापकांची, कला विक्री केंद्र आणि ताज्या घडामोडींची माहिती मिळते. हे अ‍ॅप्लिकेशन म्हणजे कलाप्रेमींसाठी व्यापक माहितीस्रोत आहे. एरवी लोकांना ही माहिती सामाजिक संपर्कस्थळे किंवा अन्य संकेतस्थळांवर शोधावी लागते. तंत्रज्ञानाचा प्रवास डेस्कटॉपपासून मोबाइलकडे होत असताना कलाप्रेमींच्या सर्व गरजांची पूर्ती एकाच ठिकाणी व्हावी या उद्देशाने आम्ही हा इंटरफेस विकसित केला आहे. त्याला प्रस्थापित कलाकारांसह नवोदित कलाकार आणि वापरकर्त्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे प्रशांत कुलकर्णी यांनी सांगितले.
डॉ. अरिवद थत्ते, मनीषा साठे, रघुनंदन पणशीकर, रामदास पळसुले, सतीश पाकणीकर, शर्वरी जमेनिस, सुयोग कुंडलकर, भरत कामत, मंजूषा पाटील, अंजली मराठे, आरती ठाकूर-कुंडलकर, चंद्रशेखर महामुनी अशा शंभरहून अधिक कलाकारांनी आर्टक्लिकवर नोंदणी केली आहे. या वर्षी एक हजार कलाकारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आर्टक्लिक हे जागतिक व्यासपीठ असून देशभरातील कोणताही कलाकार याचा सदस्य म्हणून नोंदणी करू शकतो, अशी माहिती सुवर्णा कुलकर्णी यांनी दिली.