आचारसंहितेच्या अंमलबजावणीकरीता निवडणूक आयोगाचा खास उपाय

माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने आचारसंहितेतही ‘हायटेक’ प्रचार करू पाहणाऱ्यांना यंदा निवडणूक आयोगाच्या अ‍ॅपद्वारे चाप बसणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि प्रचारातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कॉप (सीओपी- सिटिझन ऑन पोर्टल) हे अ‍ॅप तयार केले आहे.

या अ‍ॅपच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची उमेदवाराच्या आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर राहू शकेल. नागरिकांना काही गैरप्रकार आढळल्यास छायाचित्रासह त्याची माहिती तत्काळ निवडणूक आयोगाकडे तक्रार स्वरूपात नोंदविता येणार आहे. त्यामुळे आचारसंहितेत समाजमाध्यमांमधून प्रचार करणाऱ्यांवर मतदार अ‍ॅपद्वारे नजर ठेवू शकतील.

या अ‍ॅपच्या माध्यमातून उमेदवारांसंबंधीच्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल करता येणार आहेत. या अ‍ॅपद्वारे तक्रार केलेल्या तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवण्यात येणार असून तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा अहवाल तक्रारदारास अ‍ॅपमार्फत दिसणार आहे.

पैसे, भेटवस्तू किंवा सवलतींच्या कुपनांचे वाटप, घोषणा व जाहिराती, भित्तिपत्रके, फलक, पोस्टर, होर्डिग, सरकारी गाडय़ांचा वापर, खासगी वृत्तवाहिन्या, पेड न्यूज, समाजमाध्यमे, प्रचार फेऱ्या, मिरवणुका, सभा, ध्वनिक्षेपक गैरवापर, प्रचार संपल्यानंतर प्रचारासाठी आलेल्या व्यक्तींनी हद्दीमध्ये वास्तव्य करणे, मतदानाच्या दिवशी वाहनांचा वापर इत्यादी प्रकारांच्या तक्रारी निवडणूक आयोगाला पाठविता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

निवडणुकीतील गैरप्रकार तसेच आचारसंहिता भंगाच्या तक्रारींसाठी तयार करण्यात आलेले हे अ‍ॅप https://cramat.com/s/cuowrp या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल.