छापील मजकूर असो किंवा दृकश्राव्य माध्यमातून प्रसारित होणारा कार्यक्रम. सारे काही थोडक्यात आणि वाचकांचा किंवा प्रेक्षकांचा जास्त वेळ न घेणारे असावे हा प्रसारमाध्यमांमध्ये दिसणारा ‘ट्रेंड’ देशातील ‘मोबाईल गेम्स’मध्येही दिसू लागला आहे. मोबाईलवरील गेम खेळण्याचे प्रत्येक ‘सेशन’ शक्य तितके कमी वेळाचे आणि पटापट पुढे सरकणारे असावे याकडे गेम खेळणाऱ्यांचा कल आहे.
‘रीलायन्स एंटरटेन्मेंट- डिजिटल’ चे कार्यकारी अधिकारी मनीष अगरवाल यांनी हे निरीक्षण नोंदवले आहे. ‘रीलायन्स गेम्स’ या पुण्यातील मोबाईल गेम बनवणाऱ्या कंपनीची ओळख करून देण्यासाठी कंपनीतर्फे गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अगरवाल यांनी देशातील गेमिंगची बाजारपेठ आणि गेम खेळणाऱ्यांच्या कलाविषयी माहिती दिली.
अगरवाल म्हणाले, ‘‘देशातील मोबाईल गेम खेळणाऱ्यांपैकी बहुतेक जण ‘कॅज्युअल गेमर्स’ म्हणजे केवळ मजा म्हणून किंवा वेळ घालवण्यासाठी गेम खेळतात. सध्या देशातील एकूण ‘गेम डाऊनलोड्स’ची संख्या प्रतिमहिना २ कोटी ते २ कोटी २० लाख अशी आहे. गेम खेळण्याचे प्रत्येक ‘सेशन’ जास्त वेळखाऊ नसावे, ते पटकन खेळून व्हावे याकडे इथल्या मोबाईल गेमर्सचा ओढा आहे. विशेष म्हणजे इथल्या गेमर्सची त्या गेमशी कोणतीही भावनिक गुंतवणूक बघायला मिळत नाही. कोणत्याही एकाच ‘गेम अॅप’मध्ये फार काळ गुंतून न पडता ते लगेच दुसऱ्या गेमकडे वळतात.’’
गेम बनवण्यात पुण्याचा क्रमांक बंगळुरू किंवा कोचिनइतका वरचा नसला तरी हळूहळू शहर या उद्योगात पुढे येत असल्याचेही ते म्हणाले. 
 
मोबाईल गेम्सच्या नवीन कल्पनांचा खजिना आपल्याकडेच!
चीनमधील मोबाईल गेम्सशी तुलना करता भारतात गेम्ससाठी लागणाऱ्या पूर्णत: नवीन कल्पना मोठय़ा प्रमाणावर बघायला मिळतात, असेही मनीष अगरवाल यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ ‘गेमिंग’मध्ये मुळातच आघाडीवर असलेल्या देशांमध्ये भारत नाही. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानात काम करणाऱ्यांमध्येही नवीन उत्पादन बनवण्यासाठी लागणारा खास दृष्टिकोन नसतो. तो तयार करण्यासाठी आम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतात. परंतु आपल्याकडे बुद्धिमत्तेची कमतरता नसून मोबाईल गेम्ससाठी लागणाऱ्या नवीन कल्पनांचा खजिनाच इथे सापडतो. चीनमध्ये असे दिसत नाही. जागतिक स्तरावर चांगल्या चालणाऱ्या मोबाईल गेम्सची चिनी शैलीत केलेली नक्कल तिथे मोठय़ा प्रमाणावर बघायला मिळते.’’ ज्यांनी मोबाईल गेम बनवण्याच्या क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवले आहे, पण तो गेम उत्पादन म्हणून बाजारात कसा आणावा याची फारशी माहिती नाही, अशा नव्या गेम डिझायनर्सना मार्गदर्शन करण्यासाठी ‘इनक्युबेशन सेंटर’ सुरू करण्याची प्रक्रियाही कंपनीतर्फे सुरू असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.