दिवसभर मुले शाळा आणि शिकवण्यांमध्ये आणि पालक त्यांच्या कामात अडकलेले या सार्वत्रिक चित्रामुळे अगदी शाळेतील मुलांनाही पालक स्मार्टफोन्स घेऊन देतात. मात्र केंद्रीय शिक्षण मंडळाने मुलांना शाळेत मोबाइल्स, आय पॅड, टॅब्लेट्स, लॅपटॉप अशी उपकरणे आणण्यास मनाई केली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी शाळेतही इंटरनेटचा कसा वापर करतात यावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत.

समाजमाध्यमांचा गैरवापर, त्या माध्यमातून होणारी फसवणूक आणि आता ‘ब्लू व्हेल’सारखे खेळ यांमुळे विद्यार्थ्यांकडून केल्या जाणाऱ्या इंटरनेटच्या वापराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय शिक्षण मंडळानेही विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या इंटरनेटच्या वापराबाबत सजग राहण्याच्या सूचना शाळांना केल्या आहेत. दिवसभर कामासाठी बाहेर राहणाऱ्या पालकांकडून मुलांशी संपर्कात राहण्यासाठी त्यांना मोबाइल दिले जातात. आता ही जागा स्मार्टफोनने घेतली आहे. मात्र सुरक्षेचा भाग म्हणून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाइल फोन्स, लॅपटॉप, टॅब्लेट्स, आयपॅड, व्हिडिओ गेम संच, सीडी, डिव्हिडी असे साहित्य आणण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या विद्यार्थ्यांला मोबाइल फोन बाळगणे आवश्यक असल्यास त्याच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे शाळेच्या बसमध्ये असणाऱ्या सहायकाकडे मोबाइल असेल आणि त्यावर पालक संपर्क करू शकतील याची खातरजमा करण्यात यावी, अशा सूचनाही मंडळाने दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांकडून केल्या जाणाऱ्या इंटरनेटच्या वापराबाबतही सजग राहण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. शाळांनी अधिकृत स्वरूपातील प्रणालींचाच वापर करावा. अ‍ॅन्टिव्हायरस, फायरवॉलचा वापर करावा. काही संकेतस्थळे, प्रणाली काढून टाकाव्यात. विद्यार्थी संगणकावर काय करतो आहे किंवा इंटरनेटवर काय पाहतो आहे याकडे लक्ष ठेवता येईल अशी रचना असावी. विद्यार्थ्यांच्या वयानुसार काही संकेतस्थळांची निवड करून त्यांना तेवढीच वापरण्यास द्यावीत. विद्यार्थ्यांची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती संकेतस्थळावर देऊ नयेत. इंटरनेटच्या सुरक्षित आणि योग्य वापराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत.